मुंबईकरांच्या सेवेसाठी अहोरात्र खपणाऱ्या ‘बेस्ट’ प्रशासनाच्या हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय ‘बेस्ट’ प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार ‘बेस्ट’ प्रशासनाच्या वैद्यकीय धोरणात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांना आता तातडीने खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेणे शक्य होणार असून यकृत प्रत्यारोपण, मेंदू शस्त्रक्रिया, मधुमेह, मणक्याच्या शस्त्रक्रिया आदी महागडय़ा इलाजांसाठीही ‘बेस्ट’ प्रशासन कर्मचाऱ्यांना भरघोस आर्थिक सहाय्य देऊ करणार आहे. ‘बेस्ट’ समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी मांडलेल्या या सूचनेनंतर घेण्यात आलेल्या या निर्णयावर मान्यताप्राप्त कामगार संघटनांच्या मंजुरीची मोहोर उमटणे अद्याप बाकी आहे.
‘बेस्ट’च्या कर्मचाऱ्यांना तातडीच्या उपचारांसाठी खासगी रुग्णालयांत दाखल करण्यात आल्यानंतर काही विशिष्ट आजारांवरील उपचारांसाठी ७५ हजार रुपयांपर्यंत वैद्यकीय अर्थसहाय्य दिले जात असे. हा निर्णय ऑक्टोबर १९९९मध्ये घेण्यात आला होता. मात्र गेल्या १५ वर्षांत वैद्यकीय उपचारांच्या किमती प्रचंड वाढल्याने ही रक्कम वाढवली जावी, अशी सूचना गणाचार्य यांनी फेब्रुवारी २०१४मध्ये केली होती. तसेच हृदय शस्त्रक्रिया, मूत्रपिंडप्रत्यारोपण, कर्करोग या आजारांवरील उपचारांसह बेस्टच्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात आढळणाऱ्या मेंदू शस्त्रक्रिया, मणक्याच्या शस्त्रक्रिया, पेलव्हिक शस्त्रक्रिया, लांब हाडांच्या शस्त्रक्रिया, यकृत प्रत्यारोपण आदी उपचारांचाही समावेश करण्यात यावा, अशी मागणी गणाचार्य यांनी केली होती.
‘बेस्ट’ प्रशासनाने या सूचनांची दखल घेत आपल्या वैद्यकीय धोरणांत बदल केले आहेत. आता बेस्टचे कर्मचारी डय़ुटीवर असताना किंवा घरी असतानाही कोणतीही वैद्यकीय आणीबाणीची परिस्थिती उद्भवली, तर त्यांनी जवळच्या खासगी रुग्णालयात तातडीचे उपचार घ्यावेत, असे प्रशासनाने सुचवले आहे. या उपचारांसाठी येणारा खर्च काही मर्यादेपर्यंत ‘बेस्ट’ प्रशासन उचलेल. ही रक्कम नेमकी किती असावी, याचा निर्णय मान्यताप्राप्त कामगार संघटनांशी बोलूनच घेतला जाईल, असे ‘बेस्ट’चे महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांनी सांगितले. त्याचप्रमाणे गणाचार्य यांनी केलेल्या मागणीनुसार महागडय़ा इलाजपद्धतींसाठीचा खर्चही ‘बेस्ट’ प्रशासन उचलणार आहे, असे गुप्ता यांनी स्पष्ट केले.