लोकशाहीचा चौथा स्तंभ अथवा समाजाचा आरसा असे बिरुद मिरविणारी माध्यमे एकमेकांना स्पर्धक नसून पूरक आहेत, असे मत येथील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील बीएमएम विभागातर्फे आयोजित चर्चात्मक कार्यक्रमात व्यक्त करण्यात आले.
प्रिंट मीडिया विरुद्ध इलेक्टॉनिक मीडिया या विषयावरील चर्चासत्रात ‘लोकसत्ता’चे रोहन टिल्लू, आकाशवाणीच्या अंजली आमडेकर आणि आयबीएन ‘लोकमत’चे विनोद तळेकर यांनी आपली मते मांडली. सध्याच्या काही प्रकरणांवरून माध्यमे माणुसकी विसरली आहेत का, असा प्रश्न पडत असला तरी एक दोन उदारहणांवरून कोणताही निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल. याचे कारण माध्यमात काम करणारीही माणसेच असतात. त्यांच्याकडूनही काही वेळा चुका होऊ शकतात, असे मत व्यक्त करण्यात आले.  पत्रकारितेचे प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मनातील या माध्यमाविषयी असणारे गैरसमज दूर व्हावेत, त्यांच्या शंकांचे निरसन व्हावे, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजिला होता.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शकुंतला सिंह, समन्वयक प्रा. मुर्डेश्वर आदी या प्रसंगी उपस्थित होते. दीपाली राणे व मोहिनी धुमाळ यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत निगडे यांनी सूत्रसंचालन तर यशोधन कोरडे यांनी आभार मानले.