कलाविष्कार चॅरिटेबल ट्रस्टतर्फे येत्या २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत वांद्रे-कुर्ला संकुलात कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात पन्नासहून अधिक दालनांमधून ५०० चित्रकार-शिल्पकारांच्या कलाकृती मांडण्यात येणार आहेत.
सर्वसामान्य कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, कलेचे आदान-प्रदान व्हावे आणि रसिकांनाही कलाकृतींचा आस्वाद घेता यावा, या उद्देशाने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवातील सहभागी कलाकारांना ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर दालन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ‘भारतीय कला महोत्सव’ या नावाने ओळखला जाणारा हा मेळावा गेल्या वर्षी वरळी येथील नेहरू सेंटर येथे भरविण्यात आला होता.
भारतात सुमारे ८० हजार चित्रकार व शिल्पकार असून त्यांच्यासाठी कलादालने मात्र पुरेशी नाहीत. कलादालनांच्या अपुऱ्या संख्येमुळे अनेक कलाकारांना आपल्या कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्यासाठी काही महिने अथवा वर्षे वाट पाहावी लागते. त्यामुळे सर्वसामान्य कलाकार आणि रसिक यांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. महोत्सवात विविध परिसंवादांचेही आयोजन करण्यात आले असून यात प्रा. राजीव लोचन, अतुल दोडिया, सुधीर पटवर्धन, तस्नीम झकेरिया, हर्ष भटकळ आदी सहभागी होणार असून अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आदी देशांमधील कलाकारही सहभागी होणार आहेत.