चंद्रपूर येथे मंजूर करण्यात आलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्मितीबाबतची आढावा बैठक वन सभागृहात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार होते.
या बैठकीत महाविद्यालय उभारणीच्या विविध बाबींवर विस्तृत चर्चा करण्यात आली. गोंदिया येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या धर्तीवर चंद्रपूर येथील महाविद्यालयाची निर्मिती व्हावी, अशा सूचना मुनगंटीवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचप्रमाणे पदस्थापना, शिकवण्यात येणारे वैद्यकीय अभ्यासक्रम, इमारत उभारणीला लागणारा निधी, या विषयावरही सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच महाविद्यालयाला लागून १०० खाटांचे रुग्णालय उभारणी व आरोग्य बाबींविषयीही चर्चा झाली. या बैठकीला आमदार नानाभाऊ श्यामकुळे, कीर्तीकुमार भांगडिया, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव मनिषा म्हैसकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसकर, चंद्रपूर महापालिकेचे आयुक्त सुधीर शंभरकर, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. पी.डी. मडावी, यशवंत गायकवाड प्रामुख्याने उपस्थित होते.