कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर, पोलीस यंत्रणेच्या रंगीत तालीमने वेग पकडला असून शुक्रवारी दुपारी संवेदनशील ठिकाणांच्या यादीत समाविष्ट असणाऱ्या काळाराम मंदिरात सशस्त्र अतिरेक्यांनी शिरून काही भाविकांना ओलीस ठेवल्याची स्थिती निर्माण करत जलद प्रतिसाद पथक आणि स्थानिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता जोखण्यात आली. साधारणत: एक ते दीड तासाच्या कार्यवाहीनंतर भाविकांची सुटका करण्यात आली. अचानक सुरू झालेल्या रंगीत तालीमने स्थानिक नागरिकांसह दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये भीतीयुक्त उत्सुकता पसरली. काळाराम मंदिर परिसराची नव्याने दाखल झालेले पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरेशी जाण व्हावी, तसेच सिंहस्थात आपत्कालीन स्थिती ओढवल्यास कसा सामना करता येईल याचा सराव या माध्यमातून करण्यात आला.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर, पोलीस यंत्रणेने कायदा व सुव्यवस्था रोखण्याबरोबर संभाव्य अतिरेकी हल्ला, गर्दीचे व्यवस्थापन आदी मुद्दे समोर ठेवत तयारी सुरू केली आहे. त्या अंतर्गत महिनाभरापूर्वी गोदावरीच्या काठावर रंगीत तालीम झाली होती. त्याचा पुढील भाग शुक्रवारी काळाराम मंदिर परिसरात पार पडला. दुपारी साडे बाराच्या सुमारास या मंदिरात सशस्त्र अतिरेकी शिरले असून त्यांनी काही भाविकांना ओलीस ठेवल्याचा संदेश दिला गेला. त्यामुळे शहरातील समस्त पोलीस यंत्रणा ‘अलर्ट’ झाली. जलद प्रतिसाद पथक, बॉम्बशोधक व नाशक पथक आणि वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ काळाराम मंदिराकडे धाव घेतली. सर्वप्रथम मंदिराच्या सभोवतालचे सर्व रस्ते बंद करण्यात आले. म्हणजे मंदिराकडे अन्य वाहने वा भाविक जाऊ नये याची दक्षता घेतली गेली. मग, शस्त्रसज्ज जलद प्रतिसाद पथकाच्या जवानांनी मंदिरात प्रवेश केला. आतील भागात सावधपणे शिरकाव करून त्यांनी छाननी सुरू केली. अतिरेक्यांनी ज्या भागात भाविकांना ओलीस धरले, त्या ठिकाणी सर्व बाजूंनी घेराव टाकण्यात आला. मानक कार्यपद्धतीनुसार जवानांचे काम सुरू झाले.
दरम्यानच्या काळात मंदिर परिसरात संशयास्पद पडलेल्या वस्तूंची बॉम्बशोधक व नाशक पथकाकडून तपासणी सुरू झाली. तासाभराच्या व्यूहरचनेनंतर जवानांनी अतिरेक्यांना ताब्यात घेत भाविकांची सुटका केली आणि रंगीत तालीम पूर्णत्वास गेली.
पोलीस उपायुक्त अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी, भद्रकाली, गंगापूर, सरकारवाडा व इतर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी रंगीत तालमीत सहभागी झाले होते. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पंचवटीतील सर्व महत्त्वपूर्ण ठिकाणे व परिसराची माहिती व्हावी, यासाठी महिनाभरापासून रामकुंड ते तपोवन असे पाहणी दौरे केले जात आहेत. सिंहस्थात उपरोक्त ठिकाणी अतिरेकी हल्ला वा तत्सम काही घटना घडल्यास तिचा सामना कसा करता येईल याचा अभ्यास रंगीत तालीमद्वारे केला जात आहे. स्थानिक नागरिक व भाविकांना प्रारंभी त्याची कल्पना नसल्याने ते अनामक भीतीच्या सावटाखाली होते. पण, जेव्हा ही रंगीत तालीम असल्याचे समजले, तेव्हा त्यांनी उत्सुकतेने हा घटनाक्रम पाहण्यास गर्दी केली होती.