वचनपूर्ती मेळाव्याच्या निमित्याने जिल्ह्य़ात आलेले कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या साक्षीने खासदार दत्ता मेघे यांनी त्यांचे पक्षांतर्गत विरोधक रणजीत कांबळेंवर त्यांच्याच उपस्थितीत केलेली टीका पक्षातील गटबाजीला अधिक भक्कम करणारी ठरण्याची स्पष्ट चिन्हे आहेत.
कांबळे-मेघे यांच्यातील गटबाजी हा चांगलाच वादाचा विषय असून तो पक्षाचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्याकडेही पोहोचला आहे. मुख्यमंत्री व प्रदेश कॉग्रेसलाही ही गटबाजी हाताळावी लागली, पण जाहीर मेळाव्यात त्याची झालेली वाच्यता व प्रदेशाध्यक्षांनी कठोर शब्दात त्यावर केलेल्या टिपण्णीमुळे आगामी लोकसभा निवडणुकीवर या प्रसंगाचे निश्चित सावट पडणार आहे. जिल्हा समिती कांबळेंकडे, तर शहर कॉंग्रेस समिती खासदार मेघेंकडे, अशी स्पष्ट वाटणी प्रदेश समितीने करून दिली आहे. जिल्ह्य़ातील पहिला वचनपूर्ती मेळावा शहर समितीने म्हणजे मेघे गटाने रविवारी घेतला. पक्षांतर्गत विरोधकांसोबत एकत्र येण्याचे टाळणारे रणजीत कांबळे हे सुध्दा उपस्थित झाले.
मात्र, वचनपूर्ती मेळाव्याचे उद्दिष्टय़ दूरच पडले. खासदार दत्ता मेघेंनी आपल्या भाषणाची सुरुवात त्यांच्यावर गेल्या चार वर्षांत जिल्हा समितीने केलेल्या अन्यायाचा पाढा वाचूनच केली. सर्वाना एकत्र घेऊन काम करू शकलो नाही, अशी खंत व्यक्त करीत ते कांबळेंवर चांगलेच घसरले. सर्वाना घेऊन चालण्याची वृत्ती नाही. पक्षापेक्षा स्वत:ला मोठे समजतात. अशा वागण्याने पक्षाचे भविष्य सुरक्षित राहणार नाही. १३५ पदाधिकाऱ्यांची कुठे जिल्हा समिती असते? प्रदेशाध्यक्षांनी यात लक्ष घालावे, अन्यथा आपण पक्षाध्यक्षांकडे तक्रार करू, अशी टीका खासदार मेघेंनी कांबळेंच्याच समोर त्यांचे नाव न घेता केली. कांबळेंवर त्यांच्याच उपस्थितीत टीका करणाऱ्या मेघेंचा आविर्भाव पाहून त्यांचे समर्थकही स्तब्ध झाले, तर कांबळे समर्थक अस्वस्थ होत होते. हा नूर बदलून शेवटी खासदार मेघेंनी निवडणूक यापुढे लढणार नाही, पण राजकारण मरेपर्यंत करीन, अशी घोषणाही केली. माझा कुणाशीही व्यक्तिगत द्वेष नाही, अशी सारवासारव करीत त्यांनी पक्षाशिवाय कुणाला अस्तित्व नसल्याचे सांगून टाकले. आगामी लोकसभा निवडणुकीत सागर तुलाच तिकिट मिळेल, असा विश्वास मेघे यांनी मान्यवरांकडे पाहून ठामपणे व्यक्त केला. मगच ते थांबले.
मात्र, प्रत्येक वक्त्याच्या भाषणाच्या वेळी त्यांची नजरेने दखल घेणारे व्यासपीठावर उपस्थित रणजीत कांबळे हे मेघेंचे भाषण सुरू होताच मोबाईलवरच खिळले. मेघेंचे भाषण आटोपल्यावरच त्यांनी मान उंचावली. त्यांच्या चेहऱ्यावरील अस्वस्थता सर्वानीच टिपली. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मेघेंच्या वक्तव्याची आपल्या भाषणातून दखल घेऊन पक्षाचे नुकसान करणाऱ्यांना मी माफ  करणार नाही, असा दम देऊन टाकला. नेत्यांनी गटबाजीमुळे क लुषित वातावरण करू नये. मैत्री सर्वाची आहे, पण पक्ष संघटनेला मी प्रथम प्राधान्य देतो, असे प्रदेशाध्यक्षांचे समज देणारे बोल होते.
सागर मेघेंसाठी आगामी लोकसभा निवडणुकीत सर्व ती ताकद पणाला लावण्याचा चंग बांधणाऱ्या मेघेंनी कांबळेंच्या उपस्थितीत गटबाजीवर भाष्य करीत काय साधले, यावर आता नेत्यांची चर्चा रंगत आहे. कांबळे यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही, मात्र त्यांच्या एका निकटवर्तीयाने यावर चपखल टिपणी केली. दोन वर्षांपूर्वी प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांच्या झेंडा मार्चचा समारोप पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत सेवाग्रामला झाला. त्यावेळी याच खासदार मेघेंनी मान्यवरांची विनंती अव्हेरून व्यासपीठावर न बसता लोकांमध्ये बैठक मांडून नाराजी जाहीर केली. थेट पक्षाध्यक्षांच्या सभेला गालबोट लावणारे मेघे, अशी ठोस प्रतिमा प्रदेशाध्यक्ष ठाकरेंच्या मेंदूत उमटली आहे. ते शल्य ते वारंवार व्यक्त करतात. त्यामुळे कांबळे गटाला मेघेंच्या जाहीर टीकेचे सोयरसूतक नाही. दादा (कांबळे) थेट टीका करीत नाही. कृती करतात. त्यामुळेच मेघेंचा जळफ ळाट होत आहे. नैराश्यातून आलेल्या त्यांच्या वक्तव्याने आम्ही दु:खी नाही, तर हसू येते, असाही या कांबळे निकटवर्तीयाचा टोला होता.
मेघे-कांबळे वैर प्रदेशाध्यक्षांना जाहीर ऐकावे लागले. त्याची नोंद घ्यावी लागली. तशीच नोंद कांबळेंनीही घेतली असणार. झालेल्या जाहीर टीकेला विसरणाऱ्यांपैकी कांबळे नाहीत, हे त्यांचे हितचिंतक व विरोधक दोघेही सांगतात. गटाच्या कार्यक्रमात पाहुणे म्हणून बोलावले व टीकाही केली, याचे शल्य ठेवणारा कांबळे गट त्याचे पुढे उट्टे काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार, अशी कॉग्रेस वर्तुळातील चर्चा आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांचे वध्र्यातील आगमन आता गटबाजीला नवा चेहरा देण्याचे निमित्य ठरण्याचा सूर उमटतो.