तिकीट खिडक्यांवरील रांगा कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने एटीव्हीएम, जेटीबीएस, फॅसिलिटेटर अशा अनेक योजनांचा आधार घेतला असताना पश्चिम रेल्वे मात्र तिकीट खिडक्यांमध्येच आमूलाग्र बदल करण्याचा मार्ग अवलंबत आहे. याचाच एक भाग म्हणून गेल्या काही महिन्यांपासून पश्चिम रेल्वेवरील काही स्थानकांवर रेल्वे प्रशासनाने ‘जल्दी ५-१०’ ही विशेष तिकीट खिडकी सुरू केली आहे. या खिडकीमुळे प्रवाशांना तिकीट मिळण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद झाल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाने आकडेवारीसह स्पष्ट केले आहे.

‘जल्दी ५-१०’ म्हणजे काय?
‘जल्दी ५-१०’ हा तिकीट खिडकीचाच एक प्रकार आहे. या तिकीट खिडकीवर फक्त पाच किंवा दहा रुपयांच्या मूल्याचीच तिकिटे उपलब्ध आहेत. पश्चिम रेल्वेने ही योजना सुरू करण्याआधी ठरावीक स्थानकांमधील तिकीट खिडक्यांसमोरील गर्दीचा विचार केला. तसेच हे प्रवासी कोणत्या स्थानकांचे तिकीट काढतात, याचाही अभ्यास केला. त्यानुसार पाच आणि दहा रुपयांच्या अंतरापर्यंत येणाऱ्या स्थानकांचे टप्पे निश्चित करण्यात आले. उदाहरणार्थ, दादरहून वांद्रय़ाला जाण्यासाठी पाच रुपयांचे आणि बोरिवलीला जाण्यासाठी दहा रुपयांचे तिकीट लागते. मग अशा प्रवाशांनी इतर रांगांमध्ये उभे राहण्यापेक्षा जल्दी ५-१० तिकीट खिडकीसमोर उभे राहून झटपट तिकीट काढणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरते.  सामान्य खिडक्यांवरही तिकीट काढणाऱ्या प्रवाशांत ४० टक्के प्रवासी १० रुपये मूल्याचे तिकीट काढणारे असतात, तर २५ टक्के प्रवासी पाच रुपये मूल्याचे तिकीट काढतात. उर्वरित ३५ टक्के प्रवासी इतर तिकिटे काढतात. त्यामुळे हे ६५ टक्के प्रवासी जल्दी ५-१० या तिकीट खिडकीकडे वळतात. परिणामी उर्वरित प्रवाशांना तिकीट काढण्यातही कोणतीही अडचण येत नाही.

प्रवाशांची सोय कशी?
‘जल्दी ५-१०’ या तिकीट खिडकीवर फक्त पाच आणि दहा रुपयांच्या मूल्याचेच तिकीट मिळते. त्यामुळे प्रवासीदेखील पाच किंवा दहा रुपये सुटे काढून ठेवू शकतात. तसेच तिकीट खिडकीवरील कर्मचाऱ्याला अप किंवा डाउन दिशेकडील पाच किंवा दहा रुपयांच्या मूल्याचेच तिकीट द्यायचे असल्याने फार वेळही जात नाही. सामान्य तिकीट खिडकीवर एका मिनिटात तीन तिकीटे काढली जाऊ शकतात. मात्र या तिकीट खिडकीवर एका मिनिटात सहा ते सात तिकिटे काढता येतात. त्यामुळे ही प्रक्रिया जलद होते. परिणामी प्रवाशांची सोय होते.

कोणत्या स्थानकांवर?
सध्या ‘जल्दी ५-१०’ या तिकीट खिडक्या फक्त पाच स्थानकांतच सुरू केल्या आहेत. मात्र भविष्यात या खिडक्या इतर महत्त्वाच्या स्थानकांवर सुरू करण्याचा विचार पश्चिम रेल्वे करत आहे. या पाच स्थानकांमध्ये दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली आणि वसई रोड यांचा समावेश आहे.