शहरातुन जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गावर साकारलेला लांबलचक उड्डाण पूल आणि त्या खालील सव्‍‌र्हिस रस्ता यामुळे अपघातप्रवण क्षेत्रात अधिकच वाढ झाल्याचे अधोरेखीत होत आहे. उड्डाण पूल आणि सव्‍‌र्हिस रस्ता याचा अंतर्गत वाहतुकीला लाभ झाला की तोटा, याविषयी स्थानिकांमध्ये मतमतांतरे आहेत. थोडे थोडके नव्हे तर आठ रस्ते येऊन मिळणाऱ्या सव्‍‌र्हिस रस्त्यावरील पाथर्डी फाटा चौकाची सद्यस्थिती लक्षात घेतल्यास संपूर्ण वाहतूक रामभरोसे असल्याचे दिसते. अरुंद असणारे सव्‍‌र्हिस रस्ते दुहेरी असले तरी चालक ते एकेरी असल्याप्रमाणे वाहने दामटतात. यामुळे समोरून येणाऱ्या वाहनाला धडकण्याची शक्यता वाढते. पाथर्डी फाटा चौकातील सिग्नल यंत्रणा बंद असल्यामुळे मनाला वाटेल तसा रस्ता ओलांडला जातो. त्यातुन सुखरुपपणे जो चौक पार करु शकला, तो बचावला अशी एकंदर स्थिती आहे.
शहरातील जुन्या महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी आणि अवजड वाहनांमुळे अपघातांचा धोका कमी करण्यासाठी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सव्वा पाच किलोमीटरचा उड्डाण पूल साकारण्यात आला. तसेच शहरातील अंतर्गत वाहतुकीसाठी अस्तित्वातील सव्‍‌र्हिस रस्त्यांची नव्याने रचना करण्यात आली. यामुळे वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागेल आणि अपघातांचे प्रमाण कमी होईल अशी अपेक्षा होती. तथापि, तसे काहीच घडले नसल्याचे मागील दोन वर्षांतील स्थितीवरून लक्षात येते. नियमांचे पालन न करणे व सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी यामुळे उड्डाण पूल आणि सव्‍‌र्हिस रस्ता मृत्यूचा सापळा बनल्याचे स्पष्ट होत आहे. सोमवारी रात्री उड्डाण पुलावर डंपरला कार धडकल्याने झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. त्यात युवा पत्रकार प्रियंका डहाळे व एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह चालकाचा समावेश आहे. उड्डाण पुलावर ताशी ५० किलोमीटरची वेग मर्यादा आहे. मात्र, कोणी वाहनधारक त्याचे पालन करत नाही. दुचाकी व तीनचाकींना प्रतिबंध असताना सर्रासपणे ही वाहने पुलावरून मार्गस्थ होतात. उड्डाण पुलापेक्षा सव्‍‌र्हिस रस्त्यांवर वेगळी स्थिती नाही. अंबड औद्योगिक वसाहतीसमोरील गरवारे पॉइंट समोरून उड्डाण पुलास सुरुवात होते. त्यालगत पुलाच्या दोन्ही बाजुला शहरात ये-जा करण्यासाठी सव्‍‌र्हिस रस्ते आहेत. या रस्त्यांवरील महत्वाचा चौक म्हणजे पाथर्डी फाटा. पाथर्डी गाव देवळाली कॅम्प, सिडको, अंबड औद्योगिक वसाहत, शहरातील उर्वरित भाग यांना जोडणारा हा मुख्य चौक. यामुळे वाहनांची दिवसभर प्रचंड वर्दळ असते. तथापि, वाहतुकीचे नियमन होईल अशी येथे कोणतीही व्यवस्था नाही. साधारणत: पाच वर्षांपूर्वी या चौकात सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली. पण, आजपर्यंत ती सुरू झालेली नाही. चौकात वाहतूक पोलीस तैनात असले तरी वाहतूक सुरळीत करण्याऐवजी त्यांचे लक्ष भलतीकडे असते. सिग्नल नसल्याने चौक पार करण्यासाठी वाहनधारकांची चढाओढ सुरू असते. त्यामुळे पादचारी, विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. दुचाकी वाहनधारकांची अशीच अवस्था होते. या चौकात आजवर अनेक अपघात झाले आहेत.
सव्‍‌र्हिस रस्ता अरुंद असताना चौकालगत छोटय़ा विक्रेत्यांनी थाटलेली दुकाने आणि दररोज सायंकाळी पाथर्डी रस्त्यावर भरणारा भाजीबाजार यामुळे अभूतपूर्व कोंडी निर्माण होते. रस्त्यावरील भाजी बाजाराने नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत. परिसरातील हॉटेल, गॅरेजमुळे रस्त्यावर उभी राहणारी वाहने वेगळीच. एका हॉटेल व्यावसायिकाने ‘आपली पार्किंग उड्डाण पुलाखाली आहे’ असा फलक लावण्याची करामत केली आहे. बाहेरगावी जाणारी वाहने, टेम्पो, काळ्या-पिवळ्या टॅक्सी व जीप प्रवाशांच्या शोधार्थ चौकालगत थांबतात. सव्‍‌र्हिस रस्त्यावरून मुख्य महामार्गाला जाऊ इच्छिणाऱ्या चारचाकी व मालमोटारी भरधाव असतात. यामुळे पायी अथवा दुचाकीवर सव्‍‌र्हिस रस्ता किंवा चौक ओलांडणाऱ्यांना दररोज कसरत करावी लागते. या वेगवेगळ्या बाबी पाथर्डी फाटा येथे छोटे-मोठे अपघात घडविण्यास हातभार लावत असल्याची स्थानिकांची प्रतिक्रिया आहे.

भाजी बाजारामुळे अपघातांची शक्यता
पाथर्डी फाटा येथे सव्‍‌र्हिस रस्ता आणि पाथर्डी रस्त्यावर भरणारा भाजीबाजार मोठय़ा अपघातांना निमंत्रण देणारा ठरू शकतो. वास्तविक पाथर्डी फाटा चौकात वाहतूक बेट करावे, अशी सूचना आपण केली होती. तथापि, ही व्यवस्था न झाल्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. आपल्या पाठपुराव्यामुळे २०१० मध्ये सिग्नल यंत्रणा कार्यरत झाली. तथापि, सिग्नल यंत्रणेत चार रस्त्यावरील वाहतुकीचे व्यवस्थापनाची व्यवस्था असते. यामुळे ती कुचकामी ठरली. सध्या ती बंद आहे. उड्डाण पुलाचे काम होण्याआधी सव्‍‌र्हिस रस्ते महापालिकेच्या ताब्यात होते. त्यावेळी हे रस्ते आकाराने विस्तीर्ण होते. राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने ते अरुंद केले. यामुळे वाहतूक कोंडी व अपघात घडत आहेत.
– संजय नवले (माजी नगरसेवक)

अपघातास कारणीभूत ठरणारे घटक
* सिग्नल यंत्रणा बंद
* वाहतुकीच्या नियमनाकडे दुर्लक्ष
* सव्‍‌र्हिस रस्ता एकेरी असल्याचे समजून भरधाव जाणारी वाहने
* सव्‍‌र्हिस रस्ता व पाथर्डी रस्त्यावर भरणारा भाजीबाजार
* परिसरात उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे होणारी कोंडी