राष्ट्रगीत-प्रतिज्ञेप्रमाणे प्लास्टिकचा राष्ट्रध्वज न वापरणे व स्वातंत्र्य दिन-प्रजासत्ताक दिन साजरा केल्यानंतर राष्ट्रध्वजाचा अवमान टाळण्याविषयी जागरूकता करणारा संदेश जूनपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येणार आहे. ही जागरूकता पाठय़पुस्तकात छापून वा अन्य उपक्रमाद्वारे करण्याचा हेही लवकरच निश्चित केले जाईल, अशी माहिती राज्य सरकारतर्फे नुकतीच उच्च न्यायालयात देण्यात आली.
प्लास्टिकचा राष्ट्रध्वज वापरण्यावर, विक्रीवर आणि निर्मितीवर बंदी आणण्याबाबत सर्वसमावेशक योजना आखण्याचे आदेश न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळेस सरकारला दिले होते. त्याच वेळेस शालेय जीवनापासूनच मुलांना राष्ट्रध्वजाचा आदर कसा बाळगायचा आणि त्याचा अवमान कसा टाळायचा याची शिकवण देण्याचे नमूद करत राष्ट्रगीत-प्रतिज्ञेप्रमाणे प्लास्टिकचा राष्ट्रध्वज न वापरणे व त्याचा अवमान टाळण्याविषयीचा संदेश पाठय़पुस्तकात छापावा व त्याद्वारे जागरूकता करावी, अशी सूचना न्यायालयाने केली होती. नुकत्याच झालेल्या सुनावणीच्या वेळेस मात्र जूनपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षांतील अभ्यासक्रमात राष्ट्रध्वजाचा आदर करण्याबाबत आणि अवमान टाळण्याविषयी जागरूकता करणारा संदेश समाविष्ट करण्यात येणार आहे, अशी माहिती सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी न्यायालयाला दिली.
प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजावर बंदी घालण्याची मागणी हिंदू जनजागृती समिती या संस्थेने जनहित याचिकेद्वारे केली असून न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती व्ही. एल. अचलिया यांच्या खंडपीठासमोर नुकत्याच झालेल्या सुनावणीच्या वेळेस वग्यानी यांनी ही माहिती दिली. याशिवाय स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन साजरा केल्यानंतर रस्तोरस्ती कागदी, प्लास्टिकचे राष्ट्रध्वज पडलेले आढळून येतात. राष्ट्रध्वजाचा अवमान टाळण्याच्या दृष्टीने हे राष्ट्रध्वज गोळा करून ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा करण्याबाबत जागरूकता केली जात असल्याचेही वग्यानी यांनी सांगितले. त्यावर लोकांना त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात फेऱ्या घालण्यास लावण्याऐवजी याचिकाकर्त्यां संस्थेसह अन्य स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने हे काम करा, अशी सूचनाही न्यायालयाने केली. शिवाय स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनाच्या १५ दिवस आधीपासून याबाबतची जागरूकता करा, असेही न्यायालयाने सुचवले.