वर्सोवा- अंधेरी- घाटकोपर मेट्रो रेल्वेसाठी १० रुपये, १५ आणि २० रुपये हे दर आता डिसेंबरअखेपर्यंत जैसे थे राहणार आहेत. दरनिश्चिती समितीतर्फे नवीन दर अद्याप निश्चित न झाल्याने आणि प्रकरण न्यायालयात असल्याने सप्टेंबपर्यंतचे दर सध्या ‘जैसे थे’ राहतील, असे ‘मुंबई मेट्रो वन प्रा. लि.’ने म्हटले आहे.
मेट्रोच्या दरांचा तिढा सुटण्यासाठी दर निश्चित समितीतर्फे नवीन दर ठरवले जाणे आवश्यक आहे. मात्र केंद्र सरकारने अद्याप काहीच पावले उचललेली नसल्याचे उच्च न्यायालयापुढे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. त्यामुळे ही समिती स्थापन करण्याबाबत आणि ३० नोव्हेंबपर्यंत अंतिम दर निश्चित करण्यासाठी उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला मंगळवारी शेवटची संधी दिली. त्यानंतरही समिती स्थापन न झाल्यास रिलायन्सच्या दरवाढीच्या प्रस्तावाचा विचार केला जाईल, असा इशारा न्यायालयाने दिला.
न्यायालयाने केंद्र सरकारला समिती स्थापन करणार की नाही, त्यासाठी काय पावले उचलली हे १८ सप्टेंबपर्यंत कळविण्याचे बजावले होते. मंगळवारी मुख्य न्या. मोहित शहा आणि न्या. एम. एस. सोनाक यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीच्या वेळेस केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ मागितली. त्यावरून संतापलेल्या न्यायालयाने समिती स्थापन करून ३० नोव्हेंबपर्यंत अंतिम दर निश्चित करण्याबाबत केंद्र सरकारला इशारा दिला. या सर्व गोंधळात मेट्रो रेल्वेचे दर जैसे थे राहतील. डिसेंबपर्यंत हेच दर राहतील, असे ‘मुंबई मेट्रो वन प्रा. लि.’च्या प्रवक्त्याने सांगितले.