निसर्ग आणि पर्यावरणात होणाऱ्या बदलांचे वैज्ञानिक संकेत देणाऱ्या विदेशी पक्ष्यांचे स्थलांतरण शिकाऱ्यांमुळे धोक्यात आले आहे. पक्ष्यांच्या स्थलांतरणातून पर्यावरणाचे संतुलन राखण्याचे मोठे काम होत असले तरी, यादरम्यान मोठय़ा प्रमाणावर या पक्ष्यांची शिकार होत असल्याचे नागपूर, अमरावती, यवतमाळ,  अकोला व गोंदिया जिल्ह्यात निदर्शनास आले आहे.
जगातील पक्ष्यांच्या एकूण जातींपैकी सुमारे ४० टक्के पक्षी स्थलांतर करणारे आहेत. सुरक्षित हवामान आणि खाद्यान्नाच्या शोधात पक्षी लाखो मैलांचा प्रवास स्थलांतरणादरम्यान करतात. मात्र, स्थानिक लोक कुतुहलापोटी त्यांची शिकार करतात, तर मोठमोठय़ा हॉटेल्समध्येही स्थलांतरण काळात त्याचे मांस वितरित केले जाते. मासेमारीही या पक्ष्यांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरत आहे. नागपुरातील अंबाझरी तलावावर दोन वषार्ंपूर्वी जाळे लावून स्थलांतरित पक्ष्यांची शिकार झाल्याचे निदर्शनास आले होते. त्याच ठिकाणी त्यांचे मांस शिजवल्याचा प्रकारही उघडकीस आला होता.
गेल्या वर्षी अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील दुर्गम भागात आदिवासींकडून स्थलांतरित पक्ष्यांची शिकार झाली. त्यानंतर आगर येथील पाणवठय़ावरही हाच प्रकार उघडकीस आला होता. आता अमरावती जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणावर स्थलांतरित गुलाबी मैना (रोझी स्टार्लिग) या पक्ष्यांची शिकार जीवघेणी ठरत आहे. याच जिल्ह्यातील दर्यापूर व खोलापूर येथे भरणाऱ्या आठवडी बाजारात हजारोंच्या संख्येने गुलाबी मैनेची शिकार उघडकीस आली आहे. युरोपातून हिवाळ्यात स्थलांतरण करणाऱ्या या पक्ष्याला स्थानिक भाषेत ‘भाल्डय़ा’ किंवा ‘बोद्द्या’ नावाने ओळखले जाते. स्थलांतरण हे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी किंवा जीव वाचवण्यासाठी केले जाते, पण हेच स्थलांतरण आता त्यांच्यासाठी जीवघेणे ठरले आहे. गुलाबी मैनेबरोबर तितर, बटर या पक्ष्यांची नियमित शिकार होत असते. वर्धा जिल्ह्यातील देवगाव, पुलगाव व अमरावती जिल्ह्यातील खोलापूर, दर्यापूर, चंडिकापूर, खल्लार, आमला, नांदगाव खंडेश्वर, अचलपूर तर यवतमाळ जिल्ह्यातील नेर, दिग्रस आणि वाशीम जिल्ह्यातील पिंजर व अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी व मूर्तीजापूर शिवारात या पक्ष्यांची सर्रासपणे शिकार होत आहे.
स्थलांतरित पक्ष्यांची हा शिकार थांबवणे गरजेचे आहे. ‘मागणी नाही तर पुरवठा नाही’ या सिद्धांतानुरूप नागरिकांनी ते खाणे बंद केले तरच या पक्ष्यांचा जीव वाचू शकेल. वनखात्याने वन्यजीवप्रेमींच्या सहकार्याने अनेकदा छापे टाकून शिकार रोखण्याचा प्रयत्न केला, पण हे प्रयत्नही अपुरे पडत असल्याचे या शिकारीवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी या पक्ष्यांचे संरक्षण व संवर्धन करण्याचे आवाहन पक्षीप्रेमी व अभ्यासकांनी केले आहे.