ठाणे – बेलापूर मार्गावरील दिघा येथील रिलायंबल प्लाझा नजीक एमआयडीसीची जलवाहिनी मागील सात दिवसांपासून फुटली आहे. मात्र याकडे एमआयडीसीच्या आधिकांऱ्याना लक्ष देण्यासाठी वेळ नसल्याने लाखो लिटर पाणी गटारात वाहून जात आहे. या पाण्याचा वापर जलवाहिनी शेजारी थाटलेल्या झोपडय़ामधील नागरिक दैनंदिन कामासाठी करत आहेत. या जलवाहिनीत गटाराचे दूषित पाणी मिसळत असल्याने या जलवाहिन्यातून पाणी पुरवठा होणाऱ्या  नागरिकांच्या आरोग्यांचा प्रश्नदेखील ऐरणीवर आला आहे.
या जलवाहिनीतून शहरातील एमआयडीसी परिसरातील कंपन्या तसेच औद्योगिक वसाहतींना पाणीपुरवठा केला जातो. याच ठिकाणावरील विष्णुनगर मार्गाने आलेला मध्यवर्ती नाला आणि एमआयडीसीच्या जलवाहिनीचा शटल पंप आहे. या ठिकाणची जलवाहिनी मागील सात दिवसांपासून फुटल्याने लाखो लिटर पाणी दिवसभर वाया जात आहे. या ठिकाणी पत्रे विकणारी दुकाने आणि रिक्षा व बस चालक यांचे कर्मचारी याच गळतीच्या पाण्यातून बिनधास्तपणे आपल्या गाडय़ा धूत आहेत. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भात एमआयडीसीचे उपकार्यकारी अभियंता अविनाश माळी यांच्याशी संपर्क साधला असता, तुम्ही दिलेल्या माहितीमुळे त्या ठिकाणी जलवाहिनी फुटली असल्याचे समजले असल्याचे उत्तर त्यांनी दिले. या ठिकाणी अधिकारी पाठवून जलवाहिनी दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले.