येथील बाजार समितीत मागील आठवडय़ात सुरू झालेल्या डाळिंब लिलावास शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळू लागला असून शेतकऱ्यांना कमीतकमी विक्री खर्च यावा म्हणून समितीने डाळिंबासाठी पाच टक्के आडत ठेवली असल्याची माहिती नाफेडचे संचालक व बाजार समिती सभापती नानासाहेब पाटील यांनी दिली. गुरूवार व रविवार वगळता इतर सर्व दिवशी सकाळी १० ते दुपारी एकपर्यंत डाळिंब लिलाव होणार आहेत.
डाळिंब लिलावांची सुरूवात सभापती पाटील, शेतकरी गणेश पगार, फळे व भाजीपाला मर्चन्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, लासलगाव मर्चन्टस् असोसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार डागा यांच्या प्रमुख उपस्थितीत अलीकडेच करण्यात आले. यावेळी खडकओझर येथील गणेश पगार यांच्या भगवा जातीच्या डाळिंबास प्रतिक्रेट १३१२१ रूपये असा भाव मिळाला. लिलावाच्या पहिल्याच दिवशी सुमारे २१०० करंडे आवक झाली. डाळिंब लिलावास मिळालेला प्रतिसाद विचारात घेऊन भविष्यात लासलगाव बाजार समिती कांद्याबरोबरच टोमॅटो, भाजीपाला व डाळिंब या शेतीमालाच्या खरेदी-विक्रीसाठी नावारुपास येणार असल्याचे सभापती पाटील यांनी नमूद केले.
नंदकुमार डागा यांनी २० किलोच्या क्रेटमध्ये एकसारखा माल प्रतवारी करून शेतकऱ्यांनी विक्रीस आणल्यास व्यापाऱ्यांकडून त्यास चांगला भाव दिला जाईल याची हमी दिली. यापुढील काळात निफाड येथे बेदाणा व भाजीपाल्याचे लिलाव सुरू करून शेतकऱ्यांची मालविक्रीची सोय करून देण्यात येणार आहे. बाजार समितीने अडत्यामार्फत डाळिंब विक्रीची सोय निर्माण केल्याने शेतकऱ्यांना अडत्या निवडण्याचे स्वातंत्र्य मिळणार असून जो अडत्या चांगली सेवा व जास्तीत जास्त बाजारभाव मिळवून देईल त्या अडत्याच्या अडतीत डाळिंब विक्रीस मुभा राहणार असल्याने उत्पादकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.