टळटळीत उन्हात आईच्या कडेवर पक्षचिन्हाची टोपी अन् उपरणं लटकवून सहभागी झालेली चिमुरडी बालके.. गर्दीत पक्षाचे झेंडे अभिमानाने फडकावणारे मिसरुड न फुटलेले शालेय विद्यार्थी.. गुलाबी रंगाचे फेटे बांधून थाटात सहभागी झालेल्या शालेय विद्यार्थिनी.. लोकसभा निवडणूक जाहीर प्रचाराच्या समारोपाच्यावेळी झालेल्या शक्ति प्रदर्शनात गर्दी जमविण्यासाठी राजकीय पक्षांनी केलेल्या प्रयत्नात हे विदारक वास्तव समोर आले. ज्यांना मतदानाचा अधिकारही प्राप्त झालेला नाही तसेच ज्यांना निवडणूक म्हणजे काय ते समजणे अवघड आहे, असे बालगोपाळ प्रचार फे ऱ्यांमध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांची झुल घेऊन सहभागी झाले.
जाहीर प्रचाराचा अखेरचा दिवस सार्थकी लागावा यासाठी उमेदवारासह राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी विविध मार्गाचा अवलंब केला. यानिमित्त पक्षांकडून काढण्यात येणाऱ्या फेऱ्या, ‘रोड शो’द्वारे होणारे शक्ति प्रदर्शन मतदारांसाठी चर्चेचा विषय ठरला. त्याकरिता गर्दी जमवितांना कार्यकर्त्यांच्या नाकी नऊ आले. मग, कोणीही वज्र्य राहिले नाही. दोन ते तीन वर्षांच्या बालकांपासून ते उन्हाळी सुटीचा आनंद घेणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांपर्यंत असे सारेच प्रचार फेरीत सक्रिय झाले. शालेय विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुटीचा राजकीय पक्षांनी केलेला सदुपयोग मतदारांच्या चर्चेचा विषय बनला. काँग्रेस आघाडीने मध्यवस्तीत भव्य प्रचार फेरी काढली तर महायुतीतर्फे कॉलेजरोड व गंगापूर रोड भागात प्रचार फेरी काढण्यात आली. मनसे, आप व बसपाने ‘रोड शो’द्वारे शक्ति प्रदर्शन केले. एकाच दिवशी सर्व उमेदवारांकडून फेऱ्या काढल्या जाणार असल्याने पदाधिकाऱ्यांपुढे गर्दी जमविण्याचे आव्हान होते. त्याकरिता रोख रक्कम व नाश्ता, भोजन, येण्या-जाण्याची व्यवस्था असे नियोजन केले गेले. गर्दी वाढावी म्हणून माणसांची जमवाजमव फेरी सुरू होईपर्यंत सुरू राहिली. महिला, वृध्दांसह यंदा फेरीत चिमुरडी बालके, शाळकरी मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा सहभाग लक्षणिय राहिला. आईसमवेत असलेल्या चिमुरडय़ांनी पक्षाची टोपी व उपरणं स्वत:च्या अंगावर मिरविले. टळटळीत उन्हात काही वेळ गेल्यानंतर ही मुले आईच्या खांद्यावर विसावल्याचे दिसले. सध्या नाशिकचा पारा ४० अंशाच्या उंबरठय़ावर उभा आहे. उन्हाचा तडाखा सहन करणे मोठय़ा व्यक्तींच्या आवाक्याबाहेर आहे. असे असताना उन्हात आईसोबत पायपीट करणारी चिमुरडे हा तडाखा कसा सहन करणार, असे फेरीकडे उत्सुकतेने पाहणाऱ्या नागरिकांचे मत होते.
उन्हाळ्याची सुटी लागल्याने शाळकरी मुले घरीच आहेत. बाहेर उनाडक्या करण्यापेक्षा या बच्चे कंपनीला आई-वडिलांनी प्रचारात सहभागी करून घेतले. काही पालक तर ‘पैसे देऊ नका, मात्र मुलांच्या खाण्याची तसेच येण्या-जाण्याची व्यवस्था करा’ अशी इशारावजा सूचना कार्यकर्त्यांंना करताना दिसले. दहावी-बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत आनंदी आनंद होता. पालकांनी मुलांना घरात बसून राहण्याऐवजी ३००-५०० रुपये रोज या प्रमाणे रितसर प्रचारास जुंपले. दहावीची परीक्षा दिलेल्या हर्षदा शिंदे यांनी आपण पक्षाचा प्रचार वगैरे करत नाही, आज सगळे फेरीत सहभागी झाले म्हणून आपणही आल्याचे तिने सांगितले. दिवसातील दोन-तीन तास पक्षाच्या कार्यालयात जाते. त्या ठिकाणी मतदारांचे नाव शोधणे, त्यांना आवश्यक ती माहिती देणे एवढे काम करते. यासाठी दिवसाकाठी २०० रुपये मिळत असल्याचे हर्षदाने सांगितले. याद्वारे आपल्या एका शिकवणीचे पैसे जमा होत असल्याने हे काम करते असे तिचे म्हणणे.
शासकीय कन्या विद्यालयात इयत्ता नववीत शिक्षण घेणारी रेणुका म्हाळकोर हिने आपण प्रथमच फेरीत आल्याचे सांगितले. मावशीने सोबत येण्यास सांगितल्याने आपण फेरीत सहभागी झाल्याचे तिने सांगितले. प्रचार रॅलीत सहभागी झालेला म्हाडा येथील भोर टाऊनशीपचा सुयोग पवारने शाळा कधीच सोडून दिली आहे.
चहाच्या टपरीवर तो काम करतो. सध्या प्रचारात अधिक पैसे मिळत असल्याने फेरीत सहभागी झाल्याचे त्याने सांगितले. ज्या उमेदवाराकडून अधिक पैसे मिळतील, त्याचे आपण काम करत असल्याचे त्याने मान्य केले.