‘मुलांवर शिक्षकांनीच संस्कार केलेले असतात. मग, अशा टवाळखोरांविरोधात (अर्धनग्न अवस्थेत गोंधळ घालणारे संशयित) तक्रार अर्ज देऊन काय करणार.. थेट तक्रार करा.. कोणत्या विद्यार्थिनींनी ही घटना पाहिली आहे, आधी त्यांची नावे सांगा.. अशी दरडावणीची भाषा एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने केल्यावर तक्रारदार दाद तरी कोणाकडे मागणार? महापालिकेच्या फुलेनगर भागातील मुलींच्या शाळेत टवाळखोरांनी अर्धनग्न अवस्थेत धुडगूस घातल्यानंतर पंचवटी पोलीस ठाण्यात दाद मागण्यास गेलेल्या शाळा व्यवस्थापनाला अशा विचित्र अनुभवास सामोरे जावे लागले. ज्ञान मंदिरातील टवाळखोरांच्या उच्छादाने शिक्षिका भीतीच्या छायेखाली असताना पोलीस यंत्रणेकरवी त्यांना कटू अनुभव आल्याने ते हबकले आहेत.
पंचवटीतील फुलेनगर परिसर गुन्हेगारी कारवायांमुळे नेहमी चर्चेत असतो. पोलीस यंत्रणा अधूनमधून या भागात ‘कोम्बिंग ऑपरेशन’द्वारे गुन्हेगारांची धरपकड, अवैध धंदे उद्ध्वस्त करण्याची कारवाई करत असते. अशी ‘धडक’ कारवाई करणारी यंत्रणा प्रत्यक्षात गुन्हेगारांविरोधात दाद मागणाऱ्यांशी कसे वर्तन करते, याचा विदारक अनुभव पालिका शाळेच्या व्यवस्थापनाला आला. फुलेनगर परिसरात पालिकेची मुलींची शाळा आहे. पालिका शाळेतील विद्यार्थी संख्या कमी होत असताना शिक्षकांनी शर्थीने प्रयत्न करून या ठिकाणी इयत्ता आठवीचाही वर्ग सुरू केला आहे. सोमवारी शाळा सुरू झाल्यानंतर अकरा वाजताच्या सुमारास काही टवाळखोरांनी परिसरात प्रवेश केला. गच्चीवर चढून त्यांनी वर्गातील विद्यार्थिनींसमोर अश्लील हावभाव सुरू केले. अर्धनग्न अवस्थेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. शिक्षिकेने मुख्याध्यापिका व इतर शिक्षकांना मदतीसाठी बोलावून संबंधितांना हटकण्याचा प्रयत्न केला, परंतु टवाळखोर हटले नाहीत. उलट ‘तुम्हाला पोलिसात तक्रार करायची तर करा, कुठे जायचे तिकडे जा,’ असे सांगत त्यांनी शाळा व्यवस्थापनाला आव्हान दिले. या घटनेमुळे महिला शिक्षिकांसह विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण पसरले. मुख्याध्यापकांनी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, परिसर कृती समितीचे सदस्य यांच्याशी संपर्क साधून त्यांना शाळेत बोलावून घेतले. काही शिक्षकांनी टवाळखोरांच्या उच्छादाचे भ्रमणध्वनीतील कॅमेऱ्यात चित्रण केले. ही सर्व मंडळी जमा होऊ लागल्यावर टवाळखोरांनी शाळेतून पलायन केले. पालिकेच्या या शाळेत टवाळखोरांकडून विद्यार्थिनींच्या छेडछाडीचे प्रकार अधूनमधून घडत असतात, परंतु या वेळी टवाळखोरांनी सर्वासमोर लज्जास्पद वर्तन करण्यापर्यंत मजल गाठली. यामुळे मुख्याध्यापिका, शिक्षिका, कर्मचारी, व्यवस्थापन समितीचे सदस्य यांनी तक्रार अर्ज तयार करून पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पण, या ठिकाणी त्यांना धक्कादायक अनुभवाला सामोरे जावे लागले. पोलीस ठाण्यात त्यांच्याकडे उलट विचारणा सुरू झाली. पोलिसांपर्यंत येण्याची गरज काय, ती शिकलेली मुले असतील, शिक्षकच त्यांच्यावर संस्कार घडवितात, असे काही घडल्यावर पोलिसांना का बोलावितात, असे प्रश्न संबंधितांकडून उपस्थित करण्यात आले. त्या वेळी शाळा व्यवस्थापनाने ती शाळेतील मुले नसून आसपासचे टवाळखोर असल्याचे सांगितले. त्या वेळी तक्रार देऊन काय करणार, टवाळखोरांच्या नावानिशी तक्रार करा, त्यांचा उच्छाद कोणत्या विद्यार्थिनींनी पाहिला, त्यांची नावे द्या असे सांगण्यात आले. हे ऐकून शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळणारे हबकले. संपूर्ण वर्गाने हा घटनाक्रम पाहिला असला तरी एकाही विद्यार्थिनीचे नाव दिले जाणार नसल्याची भूमिका शाळा व्यवस्थापनाने घेतली. शाळेतील जबाबदार मंडळी तक्रार देत असताना विद्यार्थिनींचा तक्रारीशी संबंध काय अशी विचारणा संबंधितांनी केली. टवाळखोरांविरोधात आम्ही दाद मागायला आलो असताना आपणच असे उत्तर देत असाल तर आम्ही दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न शाळा व्यवस्थापन समितीने केला. या वेळी ज्येष्ठ शिक्षिकेला अश्रू रोखणे अनावर झाले. अखेर या प्रकरणी चार तरुणांविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

चार टवाळखोरांना अटक पण..
शाळा व्यवस्थापनाने भ्रमणध्वनीवरील छायाचित्रण दिल्यानंतर त्या आधारे महापालिकेच्या शाळेत अर्धनग्न अवस्थेत धुडगूस घालणाऱ्या चार तरुणांना पंचवटी पोलिसांनी अटक केली. त्यात राहुल बेंडाळे (१७), राजेश काळे, सागर खांडवे (१५), रोहित उफाडे (१५) यांचा समावेश आहे. अटक केलेले हे संशयित १५ ते १७ वर्षे या वयातील असल्याने त्यांना बाल न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

पालिका शाळांमधील सुरक्षाव्यवस्था अधांतरी
शहरात महापालिकेच्या एकूण १२७ शाळा असून केवळ १६ शाळांमध्ये रात्रपाळीसाठी सुरक्षारक्षक आहेत. सर्व शाळांमध्ये दिवसा व रात्री सुरक्षारक्षक नेमण्यात यावे, असा प्रस्ताव शिक्षण मंडळाने प्रशासनाकडे दिला आहे. परंतु, त्यावर अद्याप निर्णय झाला नसल्याने शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थिनींची सुरक्षाव्यवस्था अधांतरी बनली आहे. महापालिकेच्या अनेक शाळांचा वापर टारगट विद्यार्थी मद्यपान वा पत्ते खेळण्यासाठी करतात. शाळांची तावदाने फोडणे, इतर साहित्याची नासधूस करणे असे प्रकार आधी घडलेले आहेत. झोपडपट्टीतील शाळांमध्ये इतर शाळांपेक्षा अधिक दक्षता घेणे आवश्यक आहे. सर्व शाळांमध्ये सुरक्षारक्षक नेमण्याचा प्रस्ताव पालिकेकडे देण्यात आला असला तरी त्यावर कार्यवाही झाली नसल्याचे प्रशासनाधिकारी किरण कुंवर यांनी सांगितले. एखाद्या शाळेत असा प्रकार घडल्यास पालक त्या ठिकाणी पाल्यास पाठविण्यास तयार होत नाही. आधीच पालिका शाळेतील विद्यार्थी संख्या घटत असल्यामुळे शिक्षक ती वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शाळा व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता घेतली जाते. पण, त्यांचे प्रयत्न मर्यादित ठरतात.