वांद्रे स्थानकातून रिक्षाने ठाण्यात येणाऱ्या दोन मित्रांची अडीच लाख रुपयांची बॅग रिक्षात राहिल्याने त्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता. परंतु चेकनाक्यावर कार्यरत असलेल्या ठाणे वाहतूक पोलिसांना दिलेल्या जुजबी माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास करत अवघ्या काही तासांत त्यांची बॅग त्यांना परत मिळवून दिली. पोलिसांच्या या सतर्कतेमुळे या दोन्ही मित्रांचा जीव भांडय़ात पडला. ठाणे शहर वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या अनंत खांडे आणि छायानाथ शिंदे या दोन पोलिसांनी हा तपास केल्याने वाहतूक शाखेच्या वतीने त्यांना सत्कार करण्यात आला आहे.
बेळगावचे रहिवासी असलेले प्रशांत बांदेकर आणि त्यांचे मित्र राजू पाटील मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास वांद्रे रेल्वे स्थानकात उतरले. तेथून ठाण्यात येण्यासाठी त्यांनी रिक्षा पकडली. अन्य सामानासह सुमारे अडीच लाख रुपये असलेली एक बॅग त्यांनी रिक्षाच्या मागच्या बाजूस ठेवली होती. ठाण्यात पोहोचल्यानंतर त्यांनी रिक्षातील सामान उतरवून घेतले, पैशांची बॅग मात्र रिक्षातच राहिली. रिक्षा गेल्यानंतर पैशांची बॅग रिक्षात राहिल्याचा प्रकार बांदेकर आणि पाटील यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी तात्काळ दुसरी रिक्षा पकडून आनंद नगर चेकनाका गाठला. चेकनाक्यावर कार्यरत असलेले वाहतूक पोलीस कर्मचारी अनंत खांडे आणि छायानाथ शिंदे यांना हा प्रकार त्यांनी सांगितला. ‘एमएच ०३’ असा रिक्षा क्रमांक असून रिक्षाच्या मागच्या बाजूला ‘जय महाराष्ट्र’ असे लिहिलेले आहे अशी जुजबी माहिती त्यांनी पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आणि अवघ्या काही वेळातच त्यांनी रिक्षाचालकाला गाठले.
या रिक्षाचालकाला आपल्या रिक्षात बॅग राहिली आहे याची कोणतीच कल्पना नव्हती. पोलिसांनी ही रक्कम ताब्यात घेऊन प्रशांत बांदेकर यांना त्यांची रक्कम परत मिळवून दिली. खांडे आणि शिंदे यांच्या या प्रयत्नांमुळे रक्कम मिळाल्यामुळे शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला असून त्यांना पाच हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले आहे.