ठाणे-मुलुंडदरम्यान आरोग्य विभागाच्या अखत्यारीत असलेली मनोरुग्णालयाची जागा नवीन रेल्वे स्थानकासाठी उपलब्ध करून द्यावी.. ठाण्यातील घनकचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी एमएमआरडीएने तळोजा येथे घनकचरा प्रकल्पासाठी आरक्षित केलेल्या जागेपैकी ५० एकर जागा ठाणे महापालिकेला मिळावी.. कल्याणवरून नवी मुंबईकडे जाण्यासाठी कळवा-ऐरोली उन्नत मार्गासाठी राज्य शासनाने खर्चाचा भाग उचलावा..या आणि अशा मागण्यांची जंत्री ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे ठेवल्याने जुन्याच मागण्यांची नवी गंमत पाहून ठाणेकरांची सध्या करमणूक होऊ लागली आहे. 

ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी नुकतीच खासदारांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी ठाण्यातील रखडलेल्या अनेक प्रकल्पांच्या योजनांना गती देण्याची मागणीपत्र मुख्यमंत्र्यांसमोर सादर करण्यात आले. मात्र बदललेल्या खासदारांकडून नव्या प्रकल्पांची आणि नव्या योजनांची अपेक्षा असताना जुन्याच मागण्यांचे घोगंडे भिजत पडल्याचे चित्र या निमित्ताने दिसून आले. खासदारांनी सादर केलेल्या मागणीपत्रामध्ये त्याच त्याच मागण्यांबरोबरच काही जुन्या मागण्यांना नवे रूप देऊन पुन्हा मांडण्यात आल्या असल्याने मागण्यांची जंत्री देण्यापेक्षा कामे कधी सुरू होणार, असा प्रश्न नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

मनोरुग्णालयाचे भिजत घोगंडे
मनोरुग्णालयाच्या जागेवर नवे रेल्वे स्थानक उभारण्यात यावे अशी मागणी गेली अनेक वर्ष शिवसेनेकडून केली जात आहे. आरोग्य विभागाकडील ही जागा रेल्वेकडे हस्तांतरित करून त्यावर रेल्वे स्थानक त्याचप्रमाणे ठाणे मेट्रोचेही स्थानक एकाच ठिकाणी उभारण्याची जोड सूचना करण्यात आली आहे. ज्यामुळे एकाच ठिकाणी नागरिकांना दोन्ही सुविधांचा लाभ घेता येईल अशी मागणी खासदारांनी केली आहे. कल्याण-डोंबिवलीतून नवी मुंबईत जाणाऱ्यांसाठी कळवा ते ऐरोली उन्नत (एलिव्हेटेड) मार्गासाठी रेल्वे प्रशासनाकडून मंजुरी मिळाली असून त्यासाठी रेल्वेने ५० टक्के खर्च उचलण्याची तयारी दाखवली असून राज्य शासनाने उर्वरित ५० टक्के खर्च उचलल्यास हा मार्ग पूर्ण होऊ शकणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा. मंजूर प्रकल्पांच्या खर्चासाठीच्या अशा मागण्या खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या. ठाणे महापालिकेचा घनकचरा प्रकल्प राबवण्यासाठी जागाच नसल्याने आणि डायघर प्रकल्पास होत असलेल्या विरोधामुळे एमएमआरडीएने तळोजे येथे घनकचरा व्यवस्थापनासाठी संपादित केलेल्या जागेतील ५० एकर जागा ठाणे पालिकेला देण्यात यावी, अशी मागणी विचारे यांनी केली.
ठाण्यात मेट्रोबरोबरच रिंग रूटचा आराखडा ठाणे महापालिकेने केला होता. त्याला चालना मिळावी अशी मागणीही खासदारांनी केली आहे, तर सॅटिस- २ च्या प्रकल्पामध्ये विविध सुधारणाही खासदारांनी मांडल्या आहेत. त्यामध्ये ठाणे पूर्व पश्चिम जोडून बस वाहतुकीला नवा मार्ग करून द्यावा. रेल्वे स्थानक परिसरातील वस्त्यांमधील कामगारांचे पुर्नवसन करण्यात यावे. ठाणे महापालिकेसाठी स्थानक परिसरामध्ये सुविधा केंद्रासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशा महापालिका स्थरावरील मागण्यांचा समावेशही खासदारांच्या मागणीपत्रामध्ये आहे. वर्षांनुवर्षे सादर केल्या जाणाऱ्या या मागण्यांची पूर्ती काँग्रेस आघाडी सरकारने केली नाही, असा शिवसेनेचा आक्षेप असल्याने या मागण्या पुन्हा सादर करण्यात आल्याचे विचारे यांनी स्पष्ट केले.