केंद्र सरकारच्या योजनेच्या माध्यमातून मुंबईतील पदपथांवर एलईडी दिवे बसविण्याचे काम पालिकेला डावलून केंद्रीय कंपनीला दिल्याबद्दल आक्षेप घेणाऱ्या शिवसेनेने बुधवारी पालिकेच्या वरळी माहिती केंद्रातील विविध संगणक प्रणालींचा बॅकअप घेण्याचे काम एका केंद्रीय कंपनीला देऊन टाकले. भाजपने एलईडी दिव्यांचे काम केंद्रीय कंपनीला देताना विरोध करणाऱ्या शिवसेनेने संगणक प्रणालीच्या बॅकअपचे काम केंद्रीय कंपनीला देऊ नये, अशी जोरदार मागणी मनसेकडून करण्यात आली. मात्र संख्याबळाच्या जोरावर शिवसेनेने हा प्रस्ताव मंजूर केला. मात्र भाजप नेत्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेत प्रस्ताव मंजुरीसाठी माना डोलावल्या.
पालिकेच्या वरळी माहिती केंद्रात विविध खात्यांसाठी सुमारे २० संगणक प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. त्यात एसएपी, ई-ऑफिस, जकात करप्रणाली, मालमत्ता करप्रणाली, जलदेयके प्रणाली, ऑटोडीसीआर, ओम्नीडॉक्स आदींचा समावेश आहे. या संगणक प्रणालीवर अधिकाधिक माहिती साठविण्याच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी सिमँटेक नेटबॅकअप उपकरणे खरेदी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ही उपकरणे मे. राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र – सेवा इंक (मे. निक्सी) या केंद्र सरकारच्या कंपनीकडून खरेदी करण्यात येणार आहेत. त्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीत सादर करण्यात आला होता.
शिवसेनेने एलईडी दिवे केंद्रीय कंपनीकडून खरेदी करण्यास विरोध केला होता. मग आता मे. निक्सी या केंद्रीय कंपनीकडून सिमँटेक नेटबॅकअप उपकरणे का खरेदी करण्यात येत आहेत. खरेदीसंदर्भात पालिकेने एक धोरण निश्चित करावे आणि निविदा मागवून खरेदी करावी.
शिवसेना सोयीस्करपणे केंद्रीय कंपन्यांना विरोध करीत असून सिमँटेक नेटबॅकअप उपकरणे खरेदीसाठी केंद्रीय कंपनीलाच पसंती देत आहे. शिवसेनेने ही दुटप्पी भूमिका बदलावी, असा टोला मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी हाणला आणि हा प्रस्ताव राखून ठेवण्याची मागणी केली.
मनसेकडून शिवसेनेवर टीकास्र सोडण्यात येत असताना भाजप नगरसेवकांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली होती. अखेर स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी संख्याबळाच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर केला आणि भाजप नगरसेवक केवळ माना डोलावत राहिले.