शेतकरी व शेतमजुरांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मनसे आणि एकलव्य आदिवासी संघटना यांच्या वतीने बुधवारी येथील प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मनसेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले होते. त्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळाली नाही. सदोष पंचनाम्यामुळे बहुसंख्य गरजू भरपाईपासून वंचित राहिले. प्रशासकीय पातळीवर त्या संदर्भात कोणतीच कारवाई होत नसल्याची तक्रार करीत वंचित सर्व नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची मागणी मनसेतर्फे करण्यात आली. शेतमालाला हमी भाव द्यावा, शासकीय व वनखात्याच्या जमिनीत वर्षांनुवर्षे शेती कसणाऱ्या गरिबांना सात-बारा उतारा द्यावा, अन्नसुरक्षा योजनेचा गरिबांना लाभ द्यावा, निराधार वृद्धांना निवृत्तिवेतन द्यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. मोर्चात नगरसेवक गुलाब पगारे, श्रीराम सोनवणे, नकुल निकम आदी सामील झाले होते.