दिल्ली काबीज करणारा आप, विधानसभेत पहिल्या झटक्यात खाते उघडणारा एमआयएम, युती शासनाला पाठिंब्याचा टेकू देणारा आरपीआय, आता केवळ रायगड जिल्हय़ापुरता मर्यादित असलेला शेकाप यांसारखे जुनेनवे पक्ष नवी मुंबई पालिका निवडणुकीत जनाधार अजमावणार असताना मागील निवडणुकीत ६० प्रभागांत उमेदवार उभा करणारा मनसे गेला कुठे, असा सवाल नागरिक विचारत आहेत. इतर सर्व पक्षांनी इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरून घेतले असताना मनसेने एकाही उमेदवाराचा अर्ज स्वीकारलेला नाही, त्यामुळे विधानसभा निवडणुकीपासून नाउमेद झालेला हा पक्ष ही निवडणूक लढविणार की नाही या संभ्रमात कार्यकर्ते आहेत. ही निवडणूक न लढविल्यास पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांना मानणारे कार्यकर्ते दुसऱ्या पक्षाची कास धरणार असून सध्या मनसेचे इंजिन विश्रांतीसाठी कारशेडमध्ये पडून आहे.
नवी मुंबई पालिकेचे पडघम आता जोरात वाजू लागले आहेत. या आठवडय़ाच्या शेवटच्या दोन दिवसांत आचारसंहिता लागण्याची शक्यता असून पुढील महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात प्रत्यक्ष मतदान होणार आहे. राज्यातील एक श्रीमंत पालिका म्हणून या पालिकेवर प्रमुख पक्षांचा डोळा आहे. एप्रिल १९९६ रोजी झालेल्या पालिकेच्या पहिल्या निवडणुकीत शिवसेनेने काही अपक्षांच्या साथीने सत्ता आणली होती. ही सत्ता शिवसेनेचे तत्कालीन नेते गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली आणण्यात आली होती. नाईक यांचे शिवसेनेतील ग्रह फिरल्यानंतर सेनेची ही सत्ता १९९८ रोजी संपुष्टात आली. त्यानंतर दोन वर्षे नाईकांची नागरी विकास आघाडी आणि नंतर राष्ट्रवादीची सत्ता या पालिकेवर कायम राहिली आहे. सोन्याचे अंडे देणारी कोंबडी म्हणूनच या पालिकेकडे अनेक पक्ष पाहात असून सत्ता टिकविण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली असून सर्व इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरून घेतले आहेत. त्यांना उमेदवारी देण्याचा सर्वस्वी निर्णय नाईक घेणार आहेत.
पक्षातील बंडखोरी रोखण्यासाठी पक्षाचे एबी फॉर्म उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दिले जाणार आहेत. हीच स्थिती शिवसेनेची असून या पक्षाने तर प्रचारात आघाडी घेतली आहे. या पक्षाच्या काही उपऱ्या नेत्यांनी तर आयाराम गयारामांना उमेदवारी जाहीर करून टाकली आहे. काँग्रेस पक्ष म्हणून नव्हे, तर काही नगरसेवकांची वैयक्तिक मक्तेदारी म्हणून ते पक्षाच्या तिकिटावर निवडून येणार आहेत; पण ही संख्या या वर्षी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच राहणार आहे. भाजपला या पालिकेपासून खूप अपेक्षा आहेत. मंदा म्हात्रे यांच्या रूपात पक्षाला एक आमदार मिळाला आहे. त्यामुळे एकहाती सत्ता नाही तरी निर्णायक नगरसेवक निवडून आणण्याचा विडा या पक्षाचे नेते उचलणार आहेत.