पहिल्या दिवशी तीन प्रभाग सभापतिपदाची निवडणूक अविरोध पार पडल्यानंतर गुरुवारी या निवडणुकीला वेगळेच वळण मिळाले. पश्चिम प्रभाग सभापतिपदाच्या निवडणुकीत मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी व अपक्ष महाआघाडीच्या उमेदवाराला डावलत मनसेच्या बंडखोर उमेदवार माधुरी जाधव यांनी उमेदवारी कायम ठेवली. मतदानावेळी मनसेच्या दोन सदस्यांसह शिवसेना व भाजप सदस्यांनी साथ देत महाआघाडीच्या गोटात खळबळ उडवून दिली.
मनसेच्या बंडखोर जाधव यांनी महाआघाडीच्या योगिता आहेर यांना पराभूत केले. दुसरीकडे नाशिक पूर्व प्रभाग सभापतिपदी अपक्ष शबाना पठाण, तर पंचवटी प्रभागाच्या सभापतिपदी राष्ट्रवादीच्या सुनीता शिंदे यांची अविरोध निवड झाली. या निवडणुकीत मनसेतील बेबनाव पुन्हा चव्हाटय़ावर आला आहे.
महापालिका स्थायी सभापतीच्या निवडणुकीत मनसेने राष्ट्रवादी, काँग्रेस व अपक्ष यांची मोट बांधून प्रभाग सभापतिपदाची निवडणूक एकत्रितपणे लढण्याचे स्पष्ट केले होते. महाआघाडी एकत्र आल्यामुळे शहरातील सहापैकी केवळ नाशिकरोड वगळता उर्वरित पाचही प्रभागात महाआघाडीचे वर्चस्व राहणार असल्याचे स्पष्ट होते. पहिल्या दिवशी सिडको व सातपूर प्रभाग सभापतिपदी मनसेने अविरोध विजय मिळविला. नाशिकरोड प्रभाग सभापतिपदावर शिवसेनेने बाजी मारली. गुरुवारी नाशिक पूर्व, पंचवटी आणि नाशिक पश्चिम प्रभाग सभापतिपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. नाशिक पश्चिम प्रभाग सभापतिपदाच्या निवडणुकीत धक्कादायक घडामोडी घडल्या. या ठिकाणी योगिता आहेर, माधुरी जाधव, सुजाता डेरे आणि छाया ठाकरे यांनी अर्ज दाखल केले होते. महाआघाडीने आहेर यांचे नाव निश्चित केले. अर्ज माघारीच्या मुदतीत मनसेच्या जाधव यांनी आपला अर्ज मागे घेतला नाही. परिणामी महाआघाडीच्या आहेर आणि मनसेच्या बंडखोर जाधव यांच्यात लढत झाली. त्यात जाधव यांना आठ तर आहेर यांना सहा मते मिळाली. माजी महापौर अ‍ॅड. यतीन वाघ, सुनीता मोटकरी यांनी बंडखोर उमेदवाराला मतदान केले, तर मनसेच्या सुजाता डेरे आणि अन्य एका सदस्याने आहेर यांना मतदान केले. मतदानावेळी मनसेत दोन गट पडल्याचे उघड झाले. आठ विरुद्ध सहा मतांनी जाधव विजयी झाल्या. या संदर्भात आहेर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी निवडणूक प्रक्रियेत गांभीर्याने लक्ष घातले नसल्याचा आरोप केला.
या घडामोडींचा परिणाम अन्य दोन प्रभागांतील निवडणुकीवर होईल अशी शक्यता होती. परंतु पंचवटी आणि नाशिक पूर्व प्रभागात तसे काही घडले नाही. या ठिकाणी महाआघाडीच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली गेली आणि अविरोध निवड झाली.
पूर्व विभागात सहा जणांनी अर्ज दाखल केले होते. महाआघाडीने अपक्ष शबाना पठाण यांचे नाव निश्चित केले. यामुळे उर्वरित पाच जणांनी माघार घेतल्यामुळे ही निवडणूक अविरोध झाली. पंचवटी प्रभाग सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुनीता शिंदे यांचे नाव महाआघाडीकडून निश्चित झाले. यामुळे ही निवडणूक प्रक्रिया अविरोध झाली.