‘नमो’चा मंत्र जपत लोकसभेत नरेंद्र मोदींना साथ देत शिवसेनेला धोबीपछाड टाकणाऱ्या मनसेचे इंजिन आता ‘हाता’च्या इशाऱ्यावर धावू लागल्याचा प्रत्यय महापालिकेच्या प्रभाग समित्यांच्या निवडणुकांमध्ये आल्याने मनसैनिक आणि मतदारही चक्रावले आहेत. ‘दिल्लीत’ एक आणि ‘गल्लीत’ दुसरीच भूमिका घेतल्याने मनसे बहकल्याची भावना व्यक्त होत आहे.
गुजरातमधील विकासामुळे प्रभावित होऊन आपण नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिल्याचे राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर जाहीर केले. भाजपला पाठिंबा देताना शिवसेनेविरुद्ध मात्र उमेदवार उभे करून ‘मास्टर स्ट्रोक’ मारल्याचा आविर्भाव मनसेने आणला. या पाश्र्वभूमीवर मुंबई महापालिकेतील स्थायी समिती, सुधार समितीसह अन्य वैधानिक आणि विशेष समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये अनुपस्थित राहणाऱ्या मनसेने प्रभाग समितीत मात्र शिवसेनेला हात दाखविला आहे. कुठे राष्ट्रवादीला, तर कुठे काँग्रेसला मदत करून मनसेने मतदारांना आणखी बुचकळ्यात टाकले आहे. महापालिकेच्या जी-उत्तर प्रभाग समितीमध्ये शिवसेना २, रिपाई आणि अपक्ष प्रत्येकी एक असे सत्ताधाऱ्यांचे, तर काँग्रेस १ आणि मनसे पाच असे विरोधकांचे संख्याबळ आहे. जी-उत्तर प्रभाग अध्यक्षपदासाठी सत्ताधाऱ्यांनी रिपाईचे साबरेड्डी मल्लेश बोरा यांना रिंगणात उतरविले, तर काँग्रेसने आपले एकमेव नगरसेवक वकील अहमद शेख यांची उमेदवारी जाहीर केली. वैधानिक आणि विशेष समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील मनसे सदस्यांच्या अनुपस्थितीमुळे बोरा यांच्या विजयाबाबत सत्ताधारी निश्चिंत होते. परंतु आयत्या वेळी मनसेने काँग्रेसच्या पारडय़ात मते टाकली आणि वकील अहमद शेख यांच्या गळ्यात विजयश्रीची माळ पडली. एच-पूर्व आणि एच-पश्चिम प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही मनसेच्या तीन सदस्यांच्या मतांमुळे काँग्रेसच्या प्रियतमा सावंत विजयी झाल्या. त्याच वेळी के-पूर्व प्रभाग अध्यक्षाच्या निवडणुकीतील सत्ताधाऱ्यांचे बलाबल पाहून मनसेच्या सदस्याने अनुपस्थित राहणे पसंत केले. मनसेने दिल्लीमध्ये मोदींना, तर गल्लीत काँग्रेसला साथ दिल्यामुळे मतदार आणि मनसैनिक मात्र संभ्रमीत झाले आहेत.