जंगलालगतच्या गावातील आदिवासींमध्ये आजही उपचाराच्या नावावर भोंदू बाबांचा आश्रय घेतला जातो. मात्र, आता जंगल आणि वन्यजीवांसाठी काम करणाऱ्या काही संस्थांनी जंगलालगतच्या आदिवासींना त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे आणि त्याला आता हळूहळू प्रतिसादही मिळायला लागला आहे. विशेष म्हणजे या चालत्या फिरत्या आरोग्य सेवेसाठी शहरातील तरुण डॉक्टरांच्या चमुने नि:शुल्क सेवा देऊ केली आहे.
सातपुडा फाउंडेशनने फेब्रुवारी २०१४ पासून मध्य भारतातील व्याघ्र प्रकल्पालगतच्या गावांमधील गावकऱ्यांसाठी फिरत्या आरोग्य पथकाची सेवा सुरू केली. या पथकाच्यावतीने गेल्या वर्षभरात नागझिरा अभयारण्यातील सहा गावांमधील सुमारे ५ हजार रुग्णांना नि:शुल्क आरोग्य सेवा पुरवली. पथकाद्वारे नागझिरा अभयारण्यातील दुर्गम भागात कार्यरत वनमजुरांनाही या सेवेचा लाभ देण्यात आला. सुमारे एक वर्षांत या विविध व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावांमध्ये एक वर्षांपेक्षाही कमी कालावधीत दहा हजाराहून अधिक गावकऱ्यांना ही सेवा देण्यात आली.
मध्यप्रदेश पेंच व्याघ्र प्रकल्पासह महाराष्ट्र पेंच व्याघ्र प्रकल्प, नवेगाव-नागझिरा व्याघ प्रकल्प, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या गावांमध्ये ही आरोग्य सेवा पुरवली जात आहे. मध्यप्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्यातील सातपुडा-बोरी व्याघ्र प्रकल्पापर्यंत हा विस्तार झाला आहे. शनिवार, १७ जानेवारी ते १९ जानेवारीपर्यंत या क्षेत्रातील बफर क्षेत्रातील गावांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्यावतीने नि:शुल्क आरोग्य तपासणी व उपचार शिबीर आयोजित करण्यात आले आहे. होशंगाबादपासून सुमारे १०० किलोमीटरच्या अंतरावर जीवनरक्षक साहित्य आणि औषधीसह सुसज्ज फिरत्या आरोग्य सेवेच्या माध्यमातून गावकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीदरम्यान ज्या गावकऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासेल, त्यांना दाखलसुद्धा करून घेतले जाणार आहे.
या उपक्रमामुळे दुर्गम भागातील निवासी कुटुंबांसोबतच या क्षेत्रात काम करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांनासुद्धा ही
सेवा पुरवण्यात येणार असल्याचे सातपुडा फाउंडेशनचे या क्षेत्रातील अधिकारी अशफाक अरबी यांनी सांगितले.