डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात मंगळवारी सकाळी ९ ते ११ वाजताच्या सुमारास अचानक विमानतळ अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली आणि काही क्षणातच एक विमान धावपट्टीवर लॅन्ड झाले. त्यातून कमांडो व बंदूकधारी पोलीस वेगाने खाली उतरले. तेवढय़ात अतिदक्षतेचा इशारा देणारा भोंगा वाजू लागला आणि दहशतवाद्यांनी विमानाचे अपहरण केल्याचा संदेश देण्यात आला. काही मिनिटांच्या आत संपूर्ण परिसराला छावणीचे रूप आले. थोडय़ाच वेळात घाबरण्याचे काही कारण नसून हा सगळा प्रकार म्हणजे एक लष्करी कवायत असल्याचे लक्षात आले. नागपूर विमानतळावर आज विमान अपहरणाची परिस्थिती कशी हाताळावी यासाठी कवायतीची रंगीत तालीम पार पडली.
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर अतिरेकी घातपात घडवू शकतो, अशी शक्यता असल्याने त्या पाश्र्वभूमीवर ‘मॉक ड्रील’कडे गांभीर्याने पाहण्यात येत होते. विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने देशभरातील विमानतळावर अशाप्रकारचा सराव करण्यात येतो. विमानतळावर विमान अपहरणाची परिस्थिती कशा पद्धतीने हाताळता येऊ शकते, त्यासाठी लागणाऱ्या उपाययोजना कशा करता येऊ शकतात, सोयी सुविधा पुरवण्यासाठी विमानतळ प्रशासन सज्ज आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी हा सराव करण्यात आला. अपहरण करण्यात आलेल्या विमानातून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढताना अपहरणकर्त्यांना कसे बंदीस्त करता येईल या पद्धतीने सराव करण्यात आला. अपहरणाची घटना घडल्याची टर्मिनल व्यवस्थापकांनी माहिती दिल्यावर कमांडो, पोलीस, श्वान पथक काही वेळातच घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी विमानाचे अपहरणकरणाऱ्या अतिरेक्यांना पकडून प्रवाशांची सुटका केली. हा सर्व घटनाक्रम जवळपास एक ते सव्वा तास सुरू असताना अपहरण नाटय़ाचा शेवट झाला. या पूर्ण ऑपरेशनला पोलीस आयुक्त, मिहान इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे अधिकारी आणि सीआयएसएफचे अधिकारी उपस्थित होते.