बाजारपेठेची गरज, बदलत्या हवामानामुळे आधुनिक यंत्रणेस आलेले महत्व, माल निर्यातीसाठी करावयाच्या उपाययोजना अशा सर्व विषयांवर मार्गदर्शन करत तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना शेती फायदेशीर होण्यासाठीचे तंत्र समजाविले. त्यासाठी निमित्त ठरले येथे राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठानच्या वतीने ‘भाजीपाला उत्पादन, काढणी पद्धत, व्यवस्थापन आणि भाजीपाला बिजोत्पादन’ या विषयावर आयोजित राज्यस्तरीय चर्चासत्राचे.
ग्राहकांची मागणी तसेच बाजारपेठेचा नेमका वेध घेऊन शेतकऱ्यांनी गटाव्दारे पारंपरिक पध्दतीत बदल करून भाजीपाला बाजारात आणण्याचे आवाहन नाफेडचे माजी अध्यक्ष चांगदेवराव होळकर यांनी चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी केले. नाशिकचे कृषी सहसंचालक कैलास मोते हे विशेष पाहुणे तर प्रतिष्ठानचे केंद्र प्रमुख डॉ. के. पी. गुप्ता, जिल्हा कृषी अधीक्षक मधुकर पन्हाळे, कृषी संचालक आय. एन. खाटीक, आत्माचे प्रकल्प संचालक सुभाष नागरे, कृषी विज्ञान केंद्राचे रावसाहेब पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
नाशिकचे कृषी सहसंचालक कैलास मोते यांनी जिल्ह्य़ात शेतकऱ्यांचे दोन हजार गट तंत्रज्ञान वापरून आधुनिक पद्धतीने शेतीमालाचे उत्पादन करत असल्याचे नमूद केले. यापैकी ५५० गट भाजीपाला उत्पादनात आहेत. शासनाच्या विविध अनुदान योजना शेतीसाठी सुरू आहेत. बंद पडलेली कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन सुरू असल्याने शेतकऱ्यांची लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. कांद्याचे विकिरण मोठय़ा प्रमाणावर करावे म्हणून प्रतिटन तीन हजार रुपये अनुदान योजना प्रायोगिक तत्वावर सुरू आहे. या प्रक्रियेनंतर कांद्याचे आयुष्यमान किती वाढते यावर प्रतिष्ठानचे अधिकारी लक्ष ठेवून आहेत, असेही त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांना अत्याधुनिक अवजारे खरेदीसाठी अवजारांची बँक तयार करण्यात आली आहे. हा प्रयोग द्राक्ष पिकांबाबत कमालीचा यशस्वी झाला असल्याचेही त्यांनी नमूद केले. नाशिक येथील कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम सहयोगी रावसाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांना केंद्रास भेट देण्याचे आवाहन केले. याप्रसंगी गव्हाणे यांनी सूत्रसंचालन तर, आभार प्रतिष्ठानचे सहाय्यक निर्देशक आर. बी. सिंह यांनी मानले.
प्रथम सत्रात ‘भाजीपाला निर्यातमधील संधी’ विषयावर सह्य़ाद्री एक्सपोर्टचे विलास शिंदे यांनी अजूनही शेतकरी युरोपियन देशांच्या मागणीप्रमाणे कमी तिखट कांदा तयार करत नसल्याचे नमूद केले. भेंडी, कारली, मिरची स्वीटकॉर्न कोबी असा भाजीपाला निर्यात करण्यात येत असून डाळिंब निर्यातीला अधिक वाव असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी सल्लागार डॉ. अनिल अहिरे यांनी शेंडनेट, पॉलीनेट टनेलनेट या साधनांच्या खरेदीस अनुदान देण्याची अपेक्षा व्यक्त केली.
उच्च तंत्रज्ञानावर आधारीत भाजीपाला लागवड या विषयावर हेमराज राजपूत, दुपारी कांदा पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापन विषयावर कृषी सल्लागार डॉ. अनिल अहिरे, भाजीपाला पिकातील पाणी विषयांवर जैन इरिगेशनचे उमेश इंगवले यांनी मार्गदर्शन केले.