‘आधार नंबर’विषयी ग्रामीण भागात विशेष जनजागृती करण्यात शासकीय यंत्रणा अपयशी ठरल्याने त्याचा विविध प्रकारे फायदा उठविला जात असून त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी या दोन तालुक्यांमध्ये काही ठिकाणी ‘आधार नंबर’ काढण्यासाठी चक्क पैसे घेतले जात असल्याची तक्रार श्रमजीवी संघटनेने तहसीलदारांकडे केली आहे.
आधार नंबरचा उपयोग नेमका कोणकोणत्या कारणांसाठी ग्राह्य धरला जाणार आहे ते अजूनही स्पष्ट झालेले नसताना आधार नंबर काढून घेण्याचा आग्रह मात्र धरला जात आहे. त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी या तालुक्यांच्या ग्रामीण भागात आधार नंबर काढण्यासाठी श्रमजीवी संघटनेने तहसीलदारांकडे वारंवार मागणी केली. सततच्या पाठपुराव्यामुळे तहसीलदारांनी त्यांच्या मागणीची दखल घेत आधार नंबर काढण्याचे काम सुरू केले. परंतु आधार नंबर काढण्याचे काम ज्यांना देण्यात आले, त्यांनी  ग्रामीण भागातील अज्ञानाचा फायदा घेत संबंधित गावांमधील सरपंचांना हाताशी धरून आधार नंबर काढण्यासाठी काही ठिकाणी २० तर काही ठिकाणी ४० रूपये याप्रमाणे पैसे जमा करण्यास सुरुवात केली.
आधार नंबर काढण्याचे काम मोफत होत असल्याची माहिती ग्रामस्थांना माहीतच नव्हती. हा प्रकार श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना समजल्यानंतर त्यांनी संबंधित कर्मचाऱ्याला त्यासंदर्भात विचारणा केली असता हे शासनाचे नव्हे तर, खासगी काम असल्याचे उत्तर देण्यात आले.
या प्रकाराकडे संघटनेने तहसीलदारांकडे तक्रार करीत त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परंतु तरीही पैसे घेण्याचे काम सुरूच असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
‘आधार’ मिळण्याआधीच गरीबांचे आर्थिक शोषण होत आहे. तहसीलदारांनी तत्काळ भावली
बुद्रुक, वाळविहीर या गावी जाऊन या प्रकाराची चौकशी करावी अन्यथा परिसरातील सर्व ग्रामस्थांना घेऊन आधार नंबर काढण्यासाठी तहसील कार्यालयावर धडक देण्यात येईल असा इशारा संघटनेचे तालुका अध्यक्ष संतु ठोंबरे यांनी दिला आहे. अशाप्रकारे पैसे घेऊन आधार नंबर काढण्याचे काम करणाऱ्यांवर कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे.