लोकल ट्रेनमध्ये एखादा प्रवासी आपली वस्तू विसरल्यास हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क केल्यास ती परत मिळू शकते. याचा प्रत्यय गुरुवारी दोन प्रवाशांना आला. एका महिलेला आपला लॅपटॉप परत मिळाला तर एका प्रवाशाला त्याचे ४४ हजार रुपये परत मिळाले.
 गुरुवारी किमया हाटे (२७) ही महिला बोरिवलीहून चर्चगेटला जाण्यासाठी निघाली. प्रथम वर्गाच्या डब्यातून ती प्रवास करत होती. तिने आपला लॅपटॉप रॅकवर ठेवला होता. चर्चगेट स्थानक आल्यावर ती खाली उतरली. काही वेळाने आपला लॅपटॉप गाडीत विसरल्याचे तिच्या लक्षात आले. तिने तात्काळ रेल्वेच्या हेल्पलाइन क्रमांकावर दूरध्वनी केला. ती ट्रेन पुन्हा बोरिवलीसाठी रवाना झाली होती. हेल्पलाइनच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्येक स्थानकातील पोलिसांना त्याबाबत सूचना केली. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि किमया हाटे यांचा लॅपटॉप सापडला. त्याची किमंत ३९ हजार रुपये एवढी आहे.  उल्हासनगर येथील पहलाज गोधवाने हे गुरुवारी सकाळी नागपूरच्या दुरंतो गाडीतून सकाळी कल्याणला उतरले. स्थानकातून बाहेर निघाल्यावर आपण उशीखाली ठेवलेले ४४ हजार रुपयांचे पाकीट विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ हेल्पलाइन क्रमांकाला दूरध्वनी केला. डय़ुटीवरील पोलीस हवालदार बिडवे यांनी तात्काळ गाडीत शोध घेऊन गोधवानी यांचे पैसे शोधले आणि त्यांना परत केले.
प्रवासी आपली वस्तू हरवला असेल तर तात्काळ ९८३३३३११११ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन मुबंई रेल्वे पोलिसांचे प्रवक्ते  साहाय्यक पोलीस निरीक्षक रितेश अहिर यांनी केले आहे.