‘महिला आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे..’ हे कोणत्याही जाहीर भाषणातले वाक्य खरे करत देशातील पहिल्यावहिल्या मोनोरेल प्रकल्पात मोनोरेलची कप्तान म्हणून काम करणारी पूजा केणी ही नव्या पिढीसाठी एक आदर्श ठरत आहे.
मुंबईची आद्य जमात असलेल्या कोळी जमातीतील पूजाने मालाडच्या अथर्व महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी घेतली. कोळी समाजात शिक्षित मुलींचे प्रमाण कमी असते. मात्र आपल्या घरी शिक्षणाबाबत नेहमीच आग्रह होता. त्यामुळे शिक्षणाबाबत आईवडिलांनी काहीच कमी पडून दिले नाही, असे पूजा सांगते. शिक्षण झाल्यानंतर मेट्रो आणि मोनोरेल या दोन्ही प्रकल्पांसाठी भरती चालू असल्याचे समजले होते. पूजाने दोन्हीकडे कॅप्टन पदासाठीच अर्ज केला.
मेट्रो प्रकल्पाला खूपच वेळ लागणार होता. त्यामुळे मोनो प्रकल्पासाठी निवड झाल्यानंतर ती लगेच स्वीकारली, असे पूजाने सांगितले. निवड चाचणीसाठी दोन फेऱ्यांमध्ये मुलाखत झाली. या दोन्ही फेऱ्यांमध्ये तंत्रज्ञान आणि आकलन क्षमता यांची चाचणी घेण्यात आली. त्या दोन्हीमध्ये निवड झाल्यानंतर मग पुढील तीन ते चार महिने पुस्तकी आणि प्रात्यक्षिक दोन्ही प्रकारचे धडे देण्यात आले. प्रात्यक्षिक धडय़ांमध्ये मोनोरेल डेपोमधून बाहेर काढण्यापासून सर्वच गोष्टी शिकवण्यात आल्या. या वेळी सर्व पुरुषांबरोबर आम्ही सर्व कामे करत होतो. विशेष म्हणजे आम्ही स्त्रिया आहोत, आम्हाला अमुक काम जमणार नाही, वगैरेची जाणीवही आमच्या सहकाऱ्यांनी कधी करून दिली नाही, असे पूजाने स्पष्ट केले.
आपली मुलगी देशातील पहिली मोनोरेल चालवणार, याचे कौतुक घरच्यांना नक्कीच होते. लहानपणापासूनच माझ्या बाबांनी माझ्या कुतुहलाला प्रोत्साहनच दिले. टीव्हीचा रिमोट, खराब झालेला टेलिफोन अशा अनेक गोष्टी मी लहानपणी उघडून बघितल्या आहेत. घरात खिळा ठोकायचा, तर कधी आम्ही भावाची वाट कधी बघितली नाही. त्यामुळे घरातूनच स्त्री-पुरुष समानता वगैरे धडे लहानपणापासूनच मिळाले होते, असेही तिने सांगितले.
सध्या मोनोरेल चालवणाऱ्या आम्ही तिघी आहोत. महिलांनी कोणतेही क्षेत्र वज्र्य मानता कामा नये. असे कोणतेही काम नाही जे पुरुष करू शकतात पण स्त्रिया करू शकत नाहीत. त्यामुळे आपण कोणतीही दुय्यम भावना बाळगण्याचे कारण नाही, असा संदेश तिने सर्वच मुलींना आणि महिलांना दिला आहे.