मान्सूनच्या आगमनाला होत असलेला विलंब, सोयाबीन बियाणांची टंचाई यामुळे विदर्भातील शेती नियोजन कोलमडून पडण्याची शक्यता निर्माण झाली असून सोयाबीनचा सर्वाधिक पेरा करणाऱ्या विदर्भात यंदाच्या खरीप हंगामात बऱ्याच वर्षांच्या कालावधीनंतर कपाशीचा पेरा वाढण्याचे संकेत आहेत. दुसरीकडे मूग आणि उडिदाच्या पेरणीवरही परिणाम होणार आहे.
कृषी विभागाच्या नियोजनानुसार यंदाच्या खरीप हंगामात नागपूर विभागात १९ लाख ८८ हजार हेक्टर, तर अमरावती विभागात ३१ लाख ८४ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड होईल, असा अंदाज आहे. अमरावती विभागात सर्वाधिक १३ लाख ३५ हजार ६१८ हेक्टरवर सोयाबीन, ९ लाख ९१ हजार ३१० हेक्टरवर कपाशी, ३ लाख ८४ हजार ९०७ हेक्टरमध्ये तूर, १ लाख ७९ हजार हेक्टरमध्ये ज्वारीची लागवड होईल, असे गृहित धरण्यात आले आहे. नागपूर विभागात सुमारे ५ लाख हेक्टर क्षेत्रात सोयाबीन, तर ४ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड होईल, असा अंदाज आहे.
नागपूर विभागात धानाचे मोठे क्षेत्र आहे, पण त्याखालोखाल कपाशीलाही पसंती मिळू लागली आहे. विदर्भात गेल्या वर्षी २५ मे पासून पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवडय़ात पेरण्यांची बरीचशी कामे आटोपलेली होती. यावर्षी मान्सून सक्रीय होण्यास अजूनही आठवडा लागेल, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे. गेल्या वर्षी अनेक भागात अतिपावसामुळे सोयाबीनचे बियाणे तयार करण्याच्या कामात अडचणी आल्या. संपूर्ण राज्यातच सोयाबीन बियाणांची टंचाई आहे, त्यामुळे लागवडक्षम घरचे बियाणे वापरावे, असा सल्ला कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिला आहे.
अमरावती विभागात सोयाबीनच्या ६ लाख ९२ हजार क्विंटल बियाणांची मागणी नोंदवण्यात आली होती, पण प्रत्यक्षात २८ हजार १९५ क्विंटल ‘महाबीज’चे आणि १ लाख ३७ हजार ५५१ क्विंटल इतर कंपन्यांचे बियाणे उपलब्ध असल्याची माहिती आहे. नागपूर विभागात बाजारात २ लाख ५६ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांपासून कापसाला आणि तुरीला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी या पिकांच्या लागवडीकडे कल दर्शवला आहे. गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीत सोयाबीन हातचे गेले. रोखीचे पीक म्हणून सोयाबीनचा पसंतीक्रम वरचा आहे, पण चांगला दर मिळत नसल्याने कपाशीकडे शेतकरी वळत असल्याचे चित्र आहे. यंदा पाऊस लांबल्यास कपाशी आणि तुरीचे क्षेत्र वाढेल, असा अंदाज आहे.
पश्चिम विदर्भातील काही भागात मूग आणि उडीद या पिकांची लागवड केली जाते, पण हे पीक पावसाच्या नियमिततेवर अवलंबून आहे. पाऊस उशिरा आल्यास किंवा पावसाने सुरुवातीच्या काळातच मोठी ओढ दिल्यास या पिकांवर परिणाम होतो. त्यामुळे यावेळी मान्सूनचे आगमन केव्हा होणार त्यावर मूग आणि उडिदाच्या लागवडीचे भवितव्य आहे. गेल्या वर्षी काही भागात अतिपावसामुळे पिकांची हानी झाली होती. यंदा मात्र कोरडय़ा दुष्काळाचे सावट आहे. विदर्भातील बहुतांश शेतजमीन ही कोरडवाहू आहे. निसर्गाच्या कृपेवर अवलंबून असलेल्या शेत जमिनीत काय पेरावे, हा यक्षप्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.