मृग नक्षत्र सुरू होऊन जवळपास दीड महिना दडून बसलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली आणि उपराजधानीसह विदर्भाला जोरदार सरींनी सुखावले. दहा दिवसांपूर्वी मुंबई आणि कोकणात पावसाने हजेरी लावल्यानंतर वैदर्भीय आतुरतेने पावसाची वाट पाहत असताना सोमवारी रात्रीपासून विदर्भात पाऊस दाखल झाला. उकाडय़ाने हैराण झालेल्या नागरिकांना आणि शेतक ऱ्यांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. पावसामुळे शहरातील काही भागात पाणी सचले असून झाडांची पडझड झाली. मेकोसाबागमधील सिंदी हिंदी हायस्कूलमध्ये पाणी साचल्यामुळे त्या शाळेतील विद्यार्थ्यांंना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन विभागाला बोलविण्यात आले होते. कळमेश्वर तालुक्यात पाच गावांचा संपर्क तुटला आहे.
 विदर्भात नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर अकोला, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि बुलढाण्यात बऱ्यापैकी शिरवा आला. रोहिणीच्या पावसाने वैदर्भीयांना थोडाफार दिलासा दिला. मात्र तो पुरेसा नव्हता. पावसाने कोकणापर्यंत भाग व्यापल्यानंतर मान्सून जवळपास ्रआठ दिवस पुढे सरकलाच नाही. ७ जूनला मृग नक्षत्र सुरू होऊनही पाऊस येईना म्हणून गेल्या दीड महिन्यापासून वैदर्भीय चिंतातूर आणि उकाडय़ामुळे हैराण झाले होते. त्या पाश्र्वभूमीवर आजच्या पावसाने नागपूरकर मनसोक्त सुखावले गेले. अनेकांनी या ऋतूतील पहिल्या जोरदार पावसात भिजण्याचा आनंद लुटला. आज ना उद्या पाऊस येईल, हे माहिती असूनही नागरिक बेफिकीर राहिले. कालच्याप्रमाणेच आजचा दिवसही कोरडाच जाईल असा विचार करून सोबत छत्री किंवा रेनकोट घेण्याची सोमवारी रात्री अनेकांनी तसदी घेतली नाही. सोमवारी सायंकाळी ढग दाटून आल्यानंतर तेव्हा घर गाठण्याच्या घाईने त्यांनी गाडय़ा सुसाट सोडल्या. अनेकांना पावसाने मध्येच गाठले. मिळेल त्या ठिकाणी आडोसा घेत गाडी उभी करून लोकांनी वाहतूक ठप्प पाडली.
सोमवारी रात्रीपासून सुरू झालेली संततधार मंगळवारी दिवसभर सुरूच होती. सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थी आणि चाकरमानी रेनकोट घालून बाहेर पडले. विद्यार्थ्यांंनी शाळेच्या परिसरात पावसांचा आनंद घेत मस्ती केली. फुटाळा आणि अंबाझरी तलावावर युवकांनी पावसाचा आनंद लुटला. आधीच दीड महिना पाऊस उशिरा आल्यानंतर महापालिकेला खड्डे बुजविण्यासाठी आणि नाल्याची सफाईसाठी पुरेसा वेळ मिळाला होता, मात्र त्यानंतरही  शहरातील विविध भागातील खोलगट भागात पाणी साचण्याचे प्रकार दिसून आले. खोलगट भागात पाणी साचल्यामुळे अनेक लोकांच्या गाडय़ा बंद पडल्या. विदर्भात सर्वात जास्त पाऊस चंद्रपूरमध्ये झाला. अमरावतीमध्ये ८.२ मि.मी. बुलढाणा ७ मि.मी. ब्रम्हपुरी २१ मि.मी., चंद्रपूर ६५.२ मि.मी., गोंदिया ११.६ मि.मी., नागपूर १० मि.मी., वाशीम ९.८ मि.मी., वर्धा २१ मि.मी., यवतमाळ ६.२ मि.मी  पावसांची नोंद करण्यात आली.
विदर्भात जून महिना कोरडा गेल्याने शेतकऱ्यांना पेरण्या लांबणीवर टाकाव्या लागल्या. जुलैच्या पहिल्या पंधरवडय़ातही फारसा पाऊस न पडल्याने चिंतेत आणखी भर पडली. मात्र सोमवारी रात्रीपासून पावसाने चांगला जोर धरला आहे. आज सकाळपासून ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन झाले नाही. शहरात सोमवारी दुपारपासून ढगाळ वातावरणाचे साम्राज्य असून मंगळवारी सकाळपासून सूर्यदर्शन झालेले नाही. काल रात्रभर पडत असलेला पाऊस आज दुपापर्यंत सुरू असल्याने खऱ्या अर्थाने पावसाळा अनुभवता आला. पावसापासून बचावासाठी रेनकोट किंवा छत्री घेतल्याशिवाय बाहेर पडणे कठीण झाले होते.
या पावसामुळे वातावरणातील उष्मा गायब होऊन गारवा आलेला आहे. चहाच्या टपऱ्यांवरील वर्दळ वाढली असून भुट्टा (मक्याचे कणीस) विक्रेत्यांचा हंगामी व्यवसायही तेजीत आला आहे.

अतिवृष्टीचा इशारा
येत्या २४ तासांत विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. यामुळे सखल भागात किंवा नदीच्या काठावर राहणाऱ्या लोकांनी सावधगिरी म्हणून सुरक्षित ठिकाणी जावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

कळमेश्वर तालुक्यात ५ गावांचा संपर्क तुटला
कळमेश्वर तालुक्यात मंगळवारी जोरदार पाऊस झाला. नदी व नाल्यांना पूर आल्याने गोवरी मार्गावरील पाच गावांचा शहराशी संपर्क तुटला आहे. यामध्ये खैरी, तोंडाखैरी, गोवरी, पारडी व खंडाळा या गावांचा समावेश आहे. नगर प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे पुलांची व रस्त्यांची कामे न झाल्याने ही आपत्ती उद्भवली आहे. यामुळे या गावांतील मुले शहरात अडकून पडली आहेत. निधी मंजूर झालेला असतानाही या मार्गावरील पुलाचे काम झालेले नाही.