आयआयटीच्या मुलांची डोकी कशी चालतील ते सांगता येत नाही. म्हणूनच कुठल्याही कामातला ‘प्रथम’चा शिरपेच इथल्या मुलांच्या शिरावर खोवला जातो. या वेळेस मुंबईच्या ‘आयआयटीयन्स’नी ‘मूड इंडिगो’ (थोडक्यात मूड आय) या डिसेंबर महिन्यात रंगणाऱ्या आपल्या ४३ व्या सांस्कृतिक महोत्सवाची यच्चयावत माहिती देणारे अ‍ॅप तयार करण्याची शक्कल लढविली आहे. त्यामुळे, मूडआयमध्ये सहभागी होणाऱ्या ८० हजाराहून अधिक विद्यार्थ्यांची व अन्य रसिकांची सोय होणार आहे.
या अ‍ॅपची दोन वैशिष्टय़े आहेत. एक म्हणजे या अ‍ॅपच्या माध्यमातून मूड इंडिगोत सहभागी होणाऱ्यांना आपली दिवसभराची योजना आखणे सोपे जाणार आहे. चार दिवसांच्या मूड आयमध्ये संगीत मैफली, म्युझिक बॅण्ड, फॅशन शो आदी नानाविध सांस्कृतिक कार्यक्रमांची सकाळपासून रात्रीपर्यंत रेलचेल असते. हे कार्यक्रम संस्थेच्या पवईतील विस्तीर्ण परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी आयोजिले जातात. अनेकदा एखादा कार्यक्रम कुठे आणि कधी आहे ते शोधणे कठीण जाते. मूड आयच्या अ‍ॅपवर सर्व कार्यक्रमांची माहिती, वेळ, ठिकाण, सहभागी होणाऱ्या कलाकारांची नावे दिली जातील. प्रत्येक कार्यक्रमाची थोडक्यात माहितीही अ‍ॅपवर असेल. शिवाय एखाद्या कार्यक्रमाची वेळ, ठिकाण बदलले किंवा एखादा कार्यक्रम लांबणार असेल तर त्याचे अपडेट अ‍ॅपवर दिले जातील. अ‍ॅप वापरणाऱ्या व्यक्तीला कार्यक्रमांचे रिमाइंडरही लावता येईल. याशिवाय कार्यक्रमाच्या ठिकाणी कसे पोहोचायचे याबाबतही मार्गदर्शन केले जाईल.
दुसरे आणि महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे या अ‍ॅपमध्ये तब्बल ५५० एकर जमिनीवर वसलेल्या आयआयटीचा नकाशा देण्यात आला आहे. राहण्याची, खाण्याची, फिरण्याची सोय कुठे आहे, प्रशासकीय इमारती तसेच ‘हँगआऊट’ करता येतील, अशी ठिकाणे कोणती यांची माहिती देण्यात आली आहे. नकाशांबरोबरच इच्छितस्थळी कसे पोहोचायचे याची माहितीही दिली जाणार आहे. तसेच पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आदी मूलभूत माहितीही देण्यात आली आहे.तुषार सक्सेना या मेकॅनिकल इंजिनीअिरगच्या तृतीय वर्षांला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने शुभम भारतीय, प्रणव तिवारी, दीपक शर्मा, प्रथम देसाई, अखिल मानेपल्ली, आदित्य प्रहराज, शुभम जैन, अक्षय जैन, स्वानंद आणि हेतल राठोड या दुसऱ्या वर्षांला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मदतीने हे अ‍ॅप तयार केले आहे. हे अ‍ॅप अ‍ॅण्ड्रॉइडवर चालेल. ‘गुगल प्ले’वरून ते मोफत डाऊनलोड करून घेता येईल.
‘मूडआयमध्ये मोठय़ा संख्येने सहभागी होणाऱ्या सेंट झेवियर्स, हंसराजसारख्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची यामुळे मोठी सोय होणार आहे. कारण, स्पर्धेचा निकाल क्षणार्धात अ‍ॅपच्या माध्यमातून उपलब्ध होईल. आतापर्यंत विजेत्यांची अंतिम यादी समन्वयकांच्या माध्यमातून हातात पडेपर्यंत त्यांना वाट पाहावी लागे,’ असे श्रेयांस कुमात या मूड आयच्या आयोजकांपैकी एक असलेल्या विद्यार्थ्यांने सांगितले.
अधिक माहितीसाठी संपर्क – http://www.moodi.org