हजारो नागरिकांची फसवणूक करणाऱ्या विकल्प ट्रेड सोल्युशन्सच्या पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करतानाच ठेवीदारांना त्यांची रक्कम परत मिळवून द्यावी, या मागणीसाठी बँक बचाव समितीच्या नेतृत्वाखाली मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांच्या मागणीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी तपास यंत्रणा, बँक बचाव समिती व ठेवीदारांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक बोलावून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे मान्य केल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. विकल्प ट्रेड सोल्युशन्सने २० महिन्यात पैसे दामदुप्पट करण्याचे आश्वासन देऊन हजारो नागरिकांकडून कोटय़वधी रुपये जमा केले. नयन मयांक ध्रुव या प्रमुख सुत्रधाराने विजय निकम, संजय भालेराव या एजंट्सच्या मदतीने गुंतवणूकदारांची फसवणूक केली. बँक बचाव समितीच्या माहितीनुसार आतापर्यंत संबंधितांनी ४२ कोटी रूपये या माध्यमातून जमा केले आहेत. या प्रकरणी फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यावर गुन्हे विभागाने गुन्हाही दाखल केला आहे. ठेवीदारांना त्यांची रक्कम परत मिळावी, याकरिता बँक बचाव समिती व ठेवीदारांची संयुक्त बैठक झाल्यानंतर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मंगळवारी डॉ. डी. एल. कराड, श्रीधर देशपांडे, तानाजी जायभावे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी विलास पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या प्रकरणातील प्रमुख संशयिताची जामीनावर सुटका झाली आहे.  ही रक्कम मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन गुन्हे विभाग, ठेवीदार व बँक बचाव समितीचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. कायद्यात ठेवीदारांना संरक्षण देण्यात आले आहे. त्याचा आधार घेऊन संबंधितांना त्याची रक्कम मिळण्यासाठी प्रयत्न केले जावेत, अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे. मोर्चेकऱ्यांचे म्हणणे जाणून घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संयुक्त बैठक बोलाविण्याचे मान्य केले.