नोकरी, व्यवसायानिमित्त उरणमध्ये स्थायिक झालेल्या कोकणवासीयांची संख्या मोठी असून या चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी आपल्या गावी वेळेत व थेट उरणमधूनच जाता यावे याकरिता उरणच्या एस.टी.बस आगारातून १५ व १६ सप्टेंबर या दोन दिवसांत सहा जादा बसेस सोडण्यात येणार आहेत, तर १७ सप्टेंबरला पोलादपूपर्यंतची बस सोडण्यात येईल, अशी माहिती एस.टी. व्यवस्थापकांनी दिली आहे.
कोकणातून विविध कारणांसाठी उरणमध्ये स्थायिक झालेल्या कोकणवासीयांसाठी विशेष जादा बसेस सोडण्यात याव्यात, अशी मागणी उरणमधील कोकणवासी उत्कर्ष संस्थेने केली होती. त्यानुसार उरणच्या एस.टी.आगारातून १५ व १६ सप्टेंबरला उरण-रत्नागिरी सकाळी ७ वाजता, उरण-दाभोळ सकाळी ७-३० वाजता, उरण ते गुहागर सकाळी ८ वाजता, उरण ते गणपतीपुळे रात्री ८-३० वाजता, उरण ते सावंतवाडी रात्री ८-३० वाजता, उरण ते पोलादपूर सकाळी ८-३० वाजता, तर उरण ते रत्नागिरी रात्री ८-३० वाजता सोडण्यात येणार आहे. या प्रवासासाठी उरण एस.टी.आगारात आरक्षण सुरू असून, यासाठी ऑनलाइन आरक्षणही करण्याची सोय असल्याची माहिती उरण एस.टी. आगाराचे प्रमुख दत्तात्रेय कुलकर्णी यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे एस.टी.च्या ज्या सुविधा ज्येष्ठ नागरिक, अंध, अपंग यांच्यासाठी आहेत, त्याही देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.