निवडणूक आयोगाने तीन टप्प्यांमध्ये पडताळणी करून कुलाब्यापासून शीवपर्यंतच्या परिसरातील तब्बल सहा लाख ५४ हजार ३५६ मतदारांची नावे मतदारयादीतून वगळली आहेत. मात्र असंख्य मृत मतदारांची नावे आजही यादीत असल्यामुळे नेमकी कुणाची नावे वगळण्यात आली असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर मोठय़ा संख्येने मतदारांची नावे वगळण्यात आल्याने पुण्याप्रमाणे मुंबईतील मतदान केंद्रांवर गोंधळ उडण्याची भीती व्यक्त होत आहे. कुलाबा, मुंबादेवी, मलबार हिल, भायखळा, शिवडी, वरळी, माहीम, वडाळा, सायन कोळीवाडा, धारावी या शहरातील १० विधानसभा मतदारसंघांमधील प्रत्येक घरामध्ये निवडणूक आयोगाने कर्मचाऱ्यांना पाठविले होते. एक-दोन वेळा नव्हे तर चक्क तीन वेळा निवडणूक आयोगाचे कर्मचारी घरोघरी गेले आणि त्यांनी मतदारांची माहिती गोळा केली. त्यानंतर ही यादी तयार करण्यात आली. या कर्मचाऱ्यांनी पायपीट करून मृत, एकापेक्षा अधिक ठिकाणच्या मतदारयादीत नावे असलेले आणि स्थलांतरित मतदारांची नावे शोधून काढली. ही नावे यादीतून वगळण्यात आली. इतकेच नव्हे तर राजकीय पक्षांची बैठक घेऊन त्यांनाही मतदारांच्या यादीची सीडी देण्यात आली होती.
पहिल्या टप्प्यात २,९७,९५५, दुसऱ्या टप्प्यात १,८०,७९६, तर तिसऱ्या टप्प्यात १,७५,६०५ अशी एकून ६,५४,३५६ मतदारांची नावे वगळण्यात आली. धारावी आणि सायन कोळीवाडा परिसरातील अनुक्रमे ८५,३०९ व ८५,०५० मतदारांना वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर भायखळा (८३,३४२) वडाळा (८१,३९३), कुलाबा (८०,१८७), वरळी (६०,८६०), मुंबादेवी (५७,५९३) या भागातही मोठय़ा संख्येने मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. त्या तुलनेत मलबार हिल (३४,८०८) आणि शिवडी (३४,००६) येथे वगळलेल्या मतदारांची संख्या कमी आहे.
निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन हे काम केले असले तरी जारी करण्यात आलेल्या अंतिम मतदारयादीत आजही असंख्य मृत मतदारांची नावे आहेत. अनेकांनी आपल्या कुटुंबातील मृत मतदाराची माहिती देऊनही त्यांची नावे काढण्यात आलेली नाहीत. स्थलांतरित झालेल्या कुटुंबातील काही सदस्यांची नावे आजही मूळ यादीत आहेत. तर मतदारसंघात राहत असलेल्या काही नागरिकांची नावे वगळली गेली आहे. मग एवढय़ा मोठय़ा संख्येने कुणाची नावे वगळण्यात आली, असा प्रश्न मतदारांना पडला आहे.
मतदारयातीतून वगळण्यात आलेल्या नावांवरुन पुण्यामध्ये गोंधळ उडाला होता. अनेक मतदार मतदान केंद्रांवर हुज्जत घालत होते. मुंबईतही मोठय़ा संख्येने मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे मुंबईतही गोंधळ उडण्याची शक्यता असल्याने पोलीस दलाने दक्षता घ्यावी, असे पत्र निवडणूक आयोगाने पोलीस महासंचालकांना पाठविले आहे, अशी माहिती मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.