मतदानाविषयी झालेली मोठय़ा प्रमाणात जागृती, बदलाविषयी आसुरलेली तरुणाई, कडाक्याचे ऊन  आणि त्यामुळे वातावरणात वाढलेली उष्णता, निवडणूक आयोगाने एक तास अगोदर दिलेली मतदानाची मुभा, मतदान केंद्रावर लागणाऱ्या रांगांपासून सुटका आणि मतदान केल्यानंतर चार दिवस बाहेर सहलींना जाण्याचे आखलेले बेत यामुळे गुरुवारी झालेल्या मतदानाच्या दिवशी मॉर्निग वॉक आटोपल्यानंतर मतदान करणाऱ्यांची संख्या जास्त होती. यात तरुणाईनेही सहभाग घेतला होता हे विशेष. धकाधकीच्या या जीवनात अलीकडे स्वत:च्या आरोग्याविषयी काळजी घेणाऱ्यांमध्ये चांगलीच जनजागृती झालेली दिसून येते. त्यामुळे हिवाळ्याच्या सुरुवातीला किंवा नवीन वर्षांत चालण्याचे अर्थात मॉर्निग वॉकचे केलेले संकल्प अनेकजण आजही पाळत असल्याचे आढळून येते. योगाभ्यास करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. शहरांतील मॉर्निग वॉकसाठी असणारे ट्रॅक, पदपथ, कमी वर्दळीचे रस्ते सध्या मॉर्निग वॉक करणाऱ्यांनी भरून गेल्याचे दिसून येतात. सकाळी चालताना आरोग्याच्या काळजीबरोबरच देशाबद्दलची काळजी करणारेदेखील अनेक जण आहेत. महागाई, भ्रष्टाचार, अत्याचार, घोटाळे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, निसर्गाचा कोप, बेरोजगारी यांसारख्या विषयावर ही मंडळी काथ्याकूट करीत असल्याचे अनेकवेळा पाहावयास मिळते. त्यामुळे मतदान झालेल्या राज्यात मतदान वाढल्याचे दिसून आले आहे. मुंबई, ठाण्यात गुरुवारी झालेल्या मतदानात मॉर्निग वॉक आटोपल्यानंतर आपल्या मतदान केंद्रात थेट जाऊन मतदान करणाऱ्यांची संख्या वाढल्याचे दिसून आले. यात मतदान करण्याची वेळ पूर्वीपेक्षा एक तास अलीकडे म्हणजेच सात वाजता केल्यामुळे मॉर्निग वॉक टू थेट मतदान केंद्रात धडक मारणाऱ्या मतदारांची संख्या लक्षणीय होती. यासाठी अनेक  मतदारांनी ओळखपत्रदेखील सोबत घेतले होते. त्यामुळे मुंबई-ठाण्यात सकाळी नऊ वाजेपर्यंत दहा टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. सकाळी दहानंतर पडणारे कडाक्याचे ऊन, त्यामुळे लागणाऱ्या घामाच्या धारा यांपासून बचाव करण्यासाठी लवकर मतदान करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांबरोबरच परिवर्तनासाठी आसुरलेला तरुण मतदारांचाही जास्त समावेश होता. नवी मुंबईला सुमारे साठ किलोमीटर लांबीचा खाडीकिनारा मिळालेला आहे. त्यामुळे बहुतांशी उपनगराच्या खाडीकिनाराच्या बाजूला जॉगिंग ट्रॅक तयार झालेले आहेत. वाशी येथे मिनी सीशोअर हा असाच एक खाडीकिनारा असून मॉर्निग वॉकसह व्यायाम करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात गर्दी होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे यातील अनेक जागृत नागरिकांनी वॉक आटोपल्यावर थेट घराजवळचे मतदान केंद्र गाठून मतदान केल्यानंतरच घरी गेल्याचे वाशीतील नागरिक अशोक चिटणीस यांनी सांगितले. वाशी सीशोअरजवळच्या मॉर्डन शाळेत मतदान केंद्र होते. हाच प्रकार ऐरोली, कोपरखैरणे, घणसोली, नेरुळ, सीबीडी या भागांत झाल्याचे दिसून येते. नेरुळमध्ये रॉक गार्डन आणि वंडर पार्कसारखी मोठी उद्याने आहेत. या ठिकाणी फिरण्यास येणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. त्यांनीही दहानंतर वाढणाऱ्या उन्हापासून सुटका करून घेण्यासाठी सकाळीच मतदान केल्याचे समजते.
भगवे मंडप उतरवले
मतदान केंद्रावर जाणाऱ्या मतदारांना मार्गदर्शन व्हावे, यासाठी सर्व पक्षांनी मतदान केंद्रापासून दीडशे मीटर अंतरावर मंडप घातले होते. मंडप घालणाऱ्या कंत्राटदाराने शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवारांसाठी भगव्या रंगाचे मंडप घातले होते. त्याला इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे पोलिसांच्या मदतीने हे मंडप नंतर उतरविण्यात आले. यात काही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना देखील भगवे मंडप घालून देण्यात आले होते. मतदाराचे नाव शोधण्यासाठी पहिल्यांदाच हायटेक वापर करताना राष्ट्रवादीच्या तंबूत लॅपटॉपचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे हायटेक नाव शोध मोहिमेची या वेळी चर्चा होत होती.

हजारो नावे गायब
ठाणे लोकसभा मतदारसंघाचे दोन विधानसभा मतदारसंघ असणाऱ्या नवी मुंबईत हजारो नावे मतदार यादीतून गायब झाल्याचे दिसून आले. संध्याकाळपर्यंत हा आकडा किती होता हे स्पष्ट होऊ शकले नाही, पण सुमारे २५ हजार नावांवर निवडणूक आयोगाने फुल्ली मारल्याचे दिसून येत होते. त्यामुळे अनेक मतदार मतदानापासून मुकल्याची चर्चा आहे. करावे गावात ६०० मतदारांना परत जावे लागल्याचे नीलेश तांडेल यांनी सांगितले.