मुंबईकर प्रवाशांसाठी ‘जीवनवाहिनी’ असणारी रेल्वे काही ना काही कारणाने याच प्रवाशांचा ‘काळ’ ठरली आहे. २०१४ या एका वर्षांत मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वेमार्गावर एकूण ३ हजार ३५२ प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर प्रवाशांच्या अपघाती मृत्यूची संख्या सगळ्यात जास्त असून तुलनेत हार्बर रेल्वे मार्गावर हे प्रमाण कमी आहे.
समीर जव्हेरी यांनी माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात पोलीस आयुक्त लोहमार्ग यांनी ही माहिती दिली आहे. मध्य रेल्वेवर गेल्या वर्षभरात एकूण १ हजार ६७९, तर पश्चिम रेल्वेवर एकूण १ हजार २०० मृत्यू झाले आहेत. हार्बर रेल्वेवर ही संख्या ४७३ इतकी आहे.
मध्य रेल्वेवर ठाणे आणि कल्याण या रेल्वे स्थानकात सर्वात जास्त म्हणजे अनुक्रमे १३० व १२३ इतके मृत्यू झाले आहेत. पश्चिम रेल्वेवर विरार आणि गोरेगाव ही स्थानके प्रवाशांसाठी जीवघेणी ठरली आहेत. येथे अनुक्रमे ९० व ८० इतके मृत्यू झाले आहेत. हार्बर रेल्वेवर सगळ्यात जास्त अपघाती मृत्यू मानखुर्द रेल्वे स्थानकात घडले असून, येथे मृत्यू झालेल्या प्रवाशांची संख्या ३९ इतकी आहे.

प्रवाशांच्या अपघाती मृत्यूची आकडेवारी
कुर्ला- ११५
कोपर- ७९
चेंबूर- ३०
वडाळा रोड- ३४
शिवडी- २२
बोरिवली- ७२
अंधेरी- ६७
कांदिवली- ६३