राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात गेल्या काही वर्षांपासून खासगी रुग्णालयांची संख्या वाढत आहे. यातील बहुतांशी रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा नसल्याची बाब उघडकीस आली आहे. या रुग्णालयांना अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्यानंतरही काहीच सुधारणा केलेली दिसत नाही. अग्निशमन विभागातर्फे त्यांना पुन्हा नोटीस देण्यात येणार आहे.  
शहरात दिवसागणिक खासगी रुग्णालयांची संख्या वाढत आहे. त्यांच्याकडून नियमांचे पालन मात्र केले जात नाही. धंतोली, रामदासपेठ, सक्करदरा आणि प्रतापनगर हा भाग ‘मेडिकल हब’ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. केवळ धंतोली आणि रामदासपेठ भागात ८०० च्या जवळपास खासगी रुग्णालये आहेत. मध्य भारतातून रुग्ण उपचारासाठी शहरात येत असल्याने नवीन रुग्णालयांच्या परवानगीचे अनेक अर्ज महापालिकेकडे प्रलंबित आहेत. नियमानुसार इमारतीच्या वापरानुसार अग्निशमन यंत्रणा उभारण्यासंबंधी वेगवेगळ्या अटी आहेत.
आपत्कालीन स्थितीत उपचार घेणाऱ्या रुग्णांना कमीत कमी वेळेत इमारतीतून बाहेर काढता यावे यासाठी विशेष उपाययोजना क्रमप्राप्त आहे. रुग्णालयासाठी इमारत उभारताना त्यासंबंधी अग्निशमन विभागाकडून रितसर परवानगी घेणे गरजेचे आहे. इमारतीच्या नकाशाला मंजुरी घेताना अग्निशामक विभागाने टाकलेल्या अटींची पूर्तता करण्याचे आश्वासन संबंधित डॉक्टरांकडून दिले जाते. परंतु इमारत पूर्ण झाल्यानंतर अटींकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. या अक्षम्य दुर्लक्षामुळे प्रसंगी रुग्णांच्या जीविताला धोका होण्याचा शक्यता असते. शहरात गेल्या दोन वर्षांत शहरातील सात रुग्णालयांमध्ये अग्निशामक यंत्रे नसल्यामुळे आगीच्या घटना घडल्या आहेत. शिवाय रामदासपेठमध्ये एका खासगी रुग्णालयात लागलेल्या आगीनंतर हा मुद्दा ऐरणीवर आला. रुग्णालयाची निर्मिती करताना कायद्यानुसार १५ मीटरपेक्षा उंच व ५० खाटांच्या रुग्णालयामध्ये ‘ऑटोमॅटिक हिट डिटेक्टर’ हॉजव्हील, फायर अलार्म सिस्टीम, वेटराईजर, भूमिगत पाण्याची टाकी असणे आवश्यक आहे. शहरात ३५ रुग्णालयांच्या इमारती १५ मीटरपेक्षा उंच आहेत. तर २४ रुग्णालये ५० खाटांची आहेत. व्यावसायिक वापरासाठी मंजूर इमारतीमध्ये रुग्णालये थाटण्यात आली आहेत. संभाव्य धोके टाळण्यासाठी रुग्णालयांना नोटीस पाठवून अग्निशमन यंत्रणा उभारण्यात येणार आहे.
यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही तर पाणी आणि वीज पुरवठा बंद करण्यात येईल. त्यासाठी महावितरणची मदत घेण्यात येणार असल्याचे अग्निशामक विभागाचे मुख्य अधिकारी राजेंद्र उचके यांनी सांगितले. आतापर्यंत क्रिम्स, सिम्स, मिडास या सारख्या रुग्णालयांना नोटीस बजावण्यात आल्याचे उचके यांनी सांगितले.
या संदर्भात महापालिकेच्या अग्निशमनविभागाने शहरातील रुग्णालयांना नोटिसा पाठवणे सुरू केले आहे. काही खासगी रुग्णालयांना यापूर्वीच ‘कारणे दाखवा’ बजावण्यात आली असून त्यानंतर नियमांचे पालन केले नाही तर रुग्णालयाचा परवाना रद्द केला जाणार असल्याचे अग्निशमन विभागाकडून सांगणात आले.