महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या दूरावस्थेला निसर्ग नाही तर आपण जबाबदार आहोत. गिर्यारोहणात हल्ली केवळ हौशी लोकांची गर्दी वाढत असून खऱ्या गिर्यारोहकांची संख्या रोडावत चालली आहे. किल्ल्यांच्या दूरावस्थेबाबत गिर्यारोहकांनीच जागरूक असणे आवश्यक आहे. जे लोक किल्ल्यांवर जातात त्यांनीच किल्ल्यांच्या संवर्धनाची जबाबदारी घेण्याची गरज आहे, असे मत महाराष्ट्र वन विभागाचे प्रधान सचिव प्रवीणसिंग परदेशी यांनी १३ व्या गिरिमित्र संमेलनाच्या निमित्ताने व्यक्त केले.
महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड आयोजित ‘सह्य़ाद्री – वनखात्याचे योगदान’  या मध्यवर्ती संकल्पनेवर ते बोलत होते.
वन विभागातर्फे ‘संयुक्त वन व्यवस्थापन समिती’ स्थापन करण्यात आली असून किल्ल्यांच्या ठिकाणी आकारल्या जाणाऱ्या नाममात्र शुल्काचा उपयोग स्वच्छता आणि वास्तूंच्या संवर्धनासाठी करण्यात येणार आहे. तसेच आजूबाजूच्या गावांमधील लोकांना प्रशिक्षित करून त्यांना या उपक्रमात सामावून घेण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग ठाणे आणि नाशिक जिल्ह्य़ात सुरू करण्यात आला असून, हळुहळू संपूर्ण राज्यभरात तो राबवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी गिर्यारोहकांनी समितीशी संपर्क साधून परिस्थिती सुधारण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन परदेशी यांनी केले.
‘फॉरेस्ट मॅन ऑफ आसाम’ अशी उपाधी मिळवलेले जादव पायेंग यांची मुलाखत यावेळी घेण्यात आली. मुलांना शाळेत दाखला देताना शाळेने त्यांच्याकडून प्रत्येकी दोन झाडे लावून घेतली पाहिजे. ती जगवण्याची जबाबदारी त्यांच्यावरच सोपवल्यास आपल्या आजुबाजूलाच जंगलांची निर्मिती होईल, अशी कल्पना पायेंग यांनी मांडली. जगण्यासाठी केवळ एक
संमेलनात ज्येष्ठ गिर्यारोहक उष:प्रभा पागे यांना ‘गिरिमित्र जीवन गौरव’ सन्मानाने गौरवण्यात आले. संमेलनाच्या मध्यवर्ती संकल्पनेवर श्री. ए. एस पाटील, मुख्य वन संरक्षक, नाशिक आणि श्री. के. पी. सिंग, मुख्य वन संरक्षक, ठाणे यांनी संबंधित वनविभागाच्या कामाची सादरीकरणे केली. तसेच महाराष्ट्र सेवासंघाचे अध्यक्ष चंद्रशेखर वझे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.  
गिरिमित्र प्रोत्साहनपर अर्थसाहाय्य सन्मान
गेल्या काही वर्षांत गिर्यारोहण आणि प्रस्तरारोहण मोहिमांचे प्रमाण घटत आहे. त्यासाठी काही प्रोत्साहनपर उपाय करावेत या दृष्टीने १२ व्या गिरिमित्र संमेलनात गिर्यारोहण आणि प्रस्तरारोहण मोहिमांसाठी प्रायोगिक तत्त्वावर आर्थिक साहाय्य देण्याचे सुतोवाच करण्यात आले होते. त्यालाच अनुसरून यावर्षी प्रायोगिक तत्त्वावर निधी देण्यात आला.  
नवीन मार्गाने चढाई करणाऱ्या तीन संस्थांच्या मोहिमांना आणि उल्लेखनीय मोहिम करणाऱ्या एका संस्थेला प्रत्येकी रु.७०००/- प्रोत्साहनपर अर्थ साहाय्य देण्यात आले. हिमालयात एकंदरीत अकरा मोहिमा गेल्या होत्या. त्यापैकी पाच संस्थाच्या मोहिमांना प्रत्येकी रु. १०,०००/- अर्थ साहाय्य देण्यात आले. तर हिमालयन क्लबच्या इंडियन ब्रिटीश मोहिमेला विशेष उल्लेखनीय मोहिमेचा सन्मान देण्यात आला.