विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी असलेला अत्यंत कमी अवधी लक्षात घेऊन शहरासह जिल्ह्यातील बहुतेक नेत्यांनी आपल्या प्रचाराच्या स्वरूपात बदल केला आहे. नेहमीप्रमाणे प्रचारात भपकेबाजपणास फाटा देऊन घरोघरी कसे पोहचता येईल यावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे अनेक उमेदवारांकडून प्रचार फेऱ्या मर्यादित करण्यात आल्या असून त्याऐवजी कार्यकर्त्यांशी जवळीक साधण्यावर आणि त्यांच्या नातेवाईकांमार्फत इतर मतदारांपर्यंत पोहचण्यास प्राधान्य दिले जात आहे. आपला उमेदवार इतरांपेक्षा कसा वेगळा आहे, याची ‘माऊथ पब्लिसिटी’ केली जात आहे.
निवडणूक प्रचारासाठी केवळ १२ दिवसांचा कालावधी उरल्याने प्रमुख उमेदवारांनी प्रचाराचे पारंपरिक स्वरूप बदलल्याचे दिसून येत आहे. कमी अवधीत अधिकाधिक मतदारांपर्यंत आपली आणि आपल्या पक्षाची भूमिका मांडण्याचे आव्हान प्रमुख उमेदवारांसमोर आहे. पक्षीय नेत्यांना संपूर्ण राज्यात फिरावे लागणार असल्याने त्यांच्या जाहीर सभा आपल्या मतदारसंघात होतील किवा नाही याविषयी काहीच सांगता येत नसल्याने उमेदवारांनी आपल्या व्यक्तीगत यंत्रणेचा प्रचारासाठी वापर करण्याचे ठरविले आहे. कमी कालावधीमुळे उमेदवारांना आपल्या प्रचाराचे संपूर्ण स्वरूपच बदलावे लागले असून सर्वकाही नव्याने ठरवावे लागत आहे. एरवी प्रचार फेऱ्या हा मतदारांपर्यंत पोहोचण्याचा एक सोपा मार्ग. परंतु आता प्रत्येक मतदारसंघात उमेदवारांची संख्या वाढली असल्याने प्रचार फेरीसाठी गर्दी जमविण्याकरिता बराच वेळ खर्ची पडण्याची शक्यता लक्षात घेऊन अनेक प्रमुख उमेदवारांनी कमीतकमी प्रचार फेऱ्या काढण्याचे नियोजन केले आहे. कारण प्रचार फेरी काढण्यासाठी अधिक प्रमाणात वेळ द्यावा लागतो. शिवाय फेरी संपल्यानंतर फेरीमध्ये सामील झालेल्या कार्यकर्त्यांची सर्वप्रकारची व्यवस्था पाहाणे आवश्यक ठरत आहे. या पाश्र्वभूमीवर ज्या भागात अत्यंत गरज आहे त्याच भागात प्रचार फेरी काढण्याचे नियोजन केले जात आहे.
कमी कालावधीत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी बहुतेक उमेदवारांनी पत्रकांचा तसेच समाज माध्यमांचा आधार घेतला आहे. भ्रमणध्वनिव्दारे प्रसिध्द व्यक्तींना स्वत: विनंती करून तर इतरांना लघुसंदेशाव्दारे मदत करण्याचे आवाहन केले जात आहे. आपआपल्या परिसरातील प्रत्येक घरात पत्रक पोहचेल याची व्यवस्था उमेदवारांकडून करण्यात येत आहे. याशिवाय नातेवाईकांच्या जाळ्याची मदत घेतली जात आहे. त्यात कार्यकर्त्यांच्या नातलगांचाही शोध घेण्यात येऊन त्यांना त्यांच्या परिसरातील अपार्टमेंट, वसाहतींपर्यंत पोहोचण्याची विनंती करण्यात येत आहे. त्या त्या परिसरातील एखाद्या प्रसिध्द व्यक्तीला हाताशी धरून त्यामार्फत परिसरात आपली प्रसिध्दी करून घेण्याचेही डावपेच आखले जात आहे.
महिला मंडळांमार्फत माऊथ पब्लिसिटी कशी होईल, याचेही सूक्ष्म नियोजन काही उमेदवारांकडून करण्यात आले आहे. आपल्या मतदारसंघातील त्या त्या समाज घटकांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन उमेदवारांकडून त्यांना प्रचाराची विनंती केली जात आहे. अशा बैठकांमध्ये संबंधित पदाधिकाऱ्यांना मदतीच्या बदल्यात त्यांच्या काही मागण्या मान्य करण्याची ग्वाही उमेदवारांकडून देण्यात येत आहे. एकूणच प्रचाराचा कमी कालावधी उमेदवारांच्या कल्पकतेची परीक्षा पाहणारा ठरत आहे.