तद्दन उत्तर भारतीय संस्कृती आणि तिथली बंदूक संस्कृती खिळवून ठेवणाऱ्या कथानकासह दाखविणारा तिग्मांशू धुलियासारख्या वेगळ्या पठडीतील दिग्दर्शकाचा तद्दन गल्लाभरू पण कथानकात असंख्य कच्चे दुवे राहिलेला सिनेमा म्हणजे ‘बुलेट राजा’. अतिशय कमकुवत पुढे काय घडणार याची पूर्ण कल्पना देणारा तथाकथित सिनेमा तिग्मांशू धुलियाने बनविला आहे. सैफ अली खानच्या चाहत्यांसाठीच जणू बनविलेला हा सिनेमा ठरतो.
राजा मिश्रा हा लखनौच्या ब्राह्मण कुटुंबातील नोकरीच्या प्रतीक्षेत असलेला तरुण काही गुंड मागे लागतात म्हणून रस्त्यावरून चाललेल्या एका लग्नाच्या वरातीत घुसतो आणि लग्नघरात जातो. तिथे रुद्र याच्याशी त्याची ओळख होते, लगेच मैत्रीसुद्धा होते. त्याच घरातील लोकांवर हल्ला करणाऱ्या लल्लन तिवारी व त्याच्या साथीदारांना रुद्रच्या मदतीने राजा पळवून लावतो, रुद्र तसेच त्याचे काका आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांचे राजा प्राण वाचवितो. उत्तर प्रदेशातील राजकीय-गुंडगिरीची संस्कृती ही आणि एवढीच या सिनेमाची पाश्र्वभूमी असल्यामुळे आपल्या कुटुंबावर हल्ला करणाऱ्या लल्लन व आपल्या भावबंदकीतील लोकांना कंठस्नान घालण्याचे राजा आणि रुद्र ठरवितात. मग एकामागून एक सूड, चित्रपटाच्या नावातच बुलेट असल्यामुळे अखंड तीन तास पिस्तुलांमधून गोळ्या सुटत राहतात. अर्थात तिग्मांशूचा सिनेमा असल्यामुळे तर्कसुसंगत पण अपेक्षित, सरधोपट पद्धतीने कथानक जाते. रामबाबू शुक्ला या स्थानिक राजकारण्याचा वरदहस्त घेऊन रुद्र आणि राजा दोघे शत्रूचा नायनाट करून लखनौ शहर परिसरात आपला दबदबा निर्माण करतात. राजकीय नेते आणि माफिया यांचे घट्ट साटेलोटे आणि दोन गटांपैकी कुठल्या तरी एका गटाला थेट पोलीस महासंचालक पदावरच्या अधिकाऱ्याचा पाठिंबा हा असंख्य हिंदी चित्रपटांमधून आलेला कथानकाचा बाज घेऊनच तिग्मांशूचा सिनेमा पडद्यावर दिसतो. त्यामुळे नवीन काहीच नाही, कथानकात नावीन्य नाही, काही संवाद वगळले तर सगळे काही अपेक्षित असलेले घडत राहिल्यामुळे प्रेक्षकाला उत्कंठा वाटूच शकत नाही. सैफ अली खानने शहरी रोमॅण्टिक नायकाच्या पेक्षा वेगळी असलेली ही व्यक्तिरेखा ‘दबंग’सलमान स्टाइलने साकारली आहे. ‘ओमकारा’ सिनेमातील ईश्वर लंगडा त्यागी या वेगळ्या भूमिकेप्रमाणेच या सिनेमातही खरेतर सैफला वेगळी भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. परंतु, कथानकात अजिबात नावीन्य नसल्यामुळे काही संवाद वगळता सैफला फारसे काही करून दाखवायला वाव नव्हता. मध्यंतरापर्यंत समांतर नायक असलेल्या जिमी शेरगिलने साकारलेली रुद्र ही व्यक्तिरेखा चांगली साकारण्याचा प्रयत्न फक्त केला असला तरी मुळातच सिनेमा कथनशैली आणि पटकथेत मंदच असल्यामुळे एकूण सिनेमा मंद ठरतो. राजाची प्रेयसी मिताली सोनाक्षी सिन्हाने नेहमीच्याच सरधोपटपणे भूमिका साकारली आहे. तिच्या व्यक्तिरेखेला सलमान खानच्या सिनेमातील तिच्या भूमिकेएवढेच आणि इतपतच महत्त्व मिळाले आहे. त्यामुळे सोनाक्षी सिन्हाला या सिनेमाची नायिका म्हणता येणार नाही. लखनौमध्ये कथानक घडत असताना मुंबई आणि कोलकात्यात नायक-नायिकेला दिग्दर्शकाने नेले आहे. तिग्मांशूचा सिनेमा असूनही गाणी अस्थानी ठरतात, त्याचबरोबर गाण्याबरोबर सिनेमाचे कथानक पुढे सरकत नाही. ‘सामने है सवेरा’ हे एकच गाणे सुश्राव्य असून सततच्या गोळीबारातून थोडेसे दिलासा देणारे ठरते इतकेच. तिग्मांशू धुलियाने तद्दन गल्लाभरू सिनेमा बनविला असला तरी त्याच्या दिग्दर्शनाचा स्पर्श जाणवत नसल्यामुळे सिनेमा मंद ठरतो.

freedom of artist marathi news
‘कलानंद’ हवा असेल तर ‘कलाकाराचं स्वातंत्र्य’ मान्य करता आलं पाहिजे…
Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
Bohada look poster
५२ आठवडे, ५२ सोंग अन् त्यांचं अस्तित्व, दाक्षिणात्य निर्माते करणार मराठी चित्रपट ‘बोहाडा’ची निर्मिती
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र