कुठे बैठकव्यवस्था नाही, तर कुठे प्रवेशपत्रे नाहीत, अशा अभूतपूर्व गोंधळामध्ये सुरू झालेल्या पदव्युत्तर विज्ञान शाखेच्या (एमएस्सी) ३० मार्चनंतरच्या सर्व प्रात्यक्षिक परीक्षा अखेर मुंबई विद्यापीठाने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता प्रात्यक्षिक परीक्षा लेखी परीक्षेनंतर होणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षा पुढे ढकलण्याचे कारण विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने स्पष्ट करण्याचे कष्ट तर घेतलेले नाहीच. तसेच, २३ ते ३० मार्चदरम्यान झालेल्या प्रात्यक्षिक परीक्षांचे काय करायचे, याबाबत विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून सूचना न आल्याने शिक्षकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.
मुळात या वर्षी एमएस्सीची प्रात्यक्षिक परीक्षा सुरू झाली तीच गोंधळामध्ये. परीक्षेपूर्वी सात ते आठ दिवस आधीच प्राध्यापकांकडे बैठक व्यवस्था व विद्यार्थ्यांच्या हातात परीक्षेची प्रवेशपत्रे (हॉलतिकीट) पडतात. परंतु, या वर्षी २३ मार्चला एमएस्सीच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होईपर्यंत या दोन्ही गोष्टी परीक्षा विभागाकडून न आल्याने परीक्षा सुरू कशा करायच्या, असा प्रश्न प्राध्यापकांसमोर होता. त्यावर काही ठिकाणी विद्यार्थ्यांच्या आडनावानुसार परीक्षा घेण्यात यावी, असे कळविण्यात आले. त्यामुळे काही महाविद्यालयांमध्ये परीक्षा उरकण्यात आल्या. विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे ओळखपत्र आणि जर्नलच्या साहाय्याने प्राध्यापकांना परीक्षा घ्याव्या लागत होत्या. मुळात या परीक्षा विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयाऐवजी वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर जाऊन द्यायच्या आहेत. त्या परीक्षा केंद्रांवर दुसऱ्याच महाविद्यालयाचे प्राध्यापक येऊन परीक्षक म्हणून परीक्षा घेतात. म्हणजे संपूर्णपणे अनोळखी असलेल्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा परीक्षकांना घ्यावी लागते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांकडे त्यांची प्रवेशपत्रे नसतील तर परीक्षा कुणाच्या जबाबदारीवर घ्यायची, असा प्राध्यापकांचा प्रश्न होता. त्यातून प्रात्यक्षिक परीक्षेच्या कामात गुंतलेल्या शिक्षकांनाच वांद्रे विधानसभा पोटनिवडणुकीची कामे लावण्यात आल्याने काही विशेषत: वांद्रे येथील महाविद्यालयांमधील प्राध्यापकांमध्ये नाराजी होती. ‘लोकसत्ता’ने प्रात्यक्षिक परीक्षांबाबत सुरू असलेल्या या सावळागोंधळावर वेळोवेळी वृत्त देऊन प्रकाश टाकला होता.
आता २८ मार्चला एक परिपत्रक पाठवून प्रात्यक्षिक परीक्षाच पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. अर्थात त्यात परीक्षा पुढे ढकलण्याचे कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. केवळ एमएससीच्या भाग १ आणि २, तसेच एमएस्सीच्या (सीबीएसजीएस) एक ते आठपर्यंतच्या सर्व सत्रांच्या ३० मार्चनंतरच्या प्रात्यक्षिक परीक्षा लेखी परीक्षेनंतर घेण्यात येतील, असे मोघमपणे कळविण्यात आले आहे. त्यात २३ ते ३० मार्चदरम्यान प्रवेशपत्रांविना झालेल्या प्रात्यक्षिक परीक्षांचे काय करायचे याचाही खुलासा करण्यात आलेला नाही. याबाबत परीक्षा नियंत्रक दिनेश भोंडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तो होऊ शकला नाही.