अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दैनंदिन कामकाज सहजसोपे करण्याचा प्रयत्न होत असला तरी एकदा अशी आधुनिक कार्यशैली स्वीकारून पुन्हा भूतकाळातील पारंपरिक पध्दतीत रममाण होण्याचा उफराटा प्रयत्न एसटी महामंडळाकडून होत आहे. पाच वर्षांपूर्वी महामंडळाने बस प्रवासाची तिकीटे इलेक्ट्रॉनिक (एटीएम) यंत्राद्वारे देण्यास सुरुवात केली. तत्पुर्वी तिकीटे वाहकामार्फत स्वत: हाताने दिली जात होती. तिकीट वितरण पध्दतीत बदल करून इतकी वर्षे लोटल्यावर आधी छापलेली कोटय़वधींची तिकीटे पडून असल्याचा साक्षात्कार झाला आणि महामंडळाने नाशिकसह राज्यातील हजारो वाहकांना आता ही छापील तिकीटे संपविण्याच्या कामास जुंपले आहे. यामुळे वाहकांची एकाच वेळी इलेक्ट्रॉनिक आणि छपाई केलेली अशी दोन तिकीटांची व्यवस्था (ट्रे) सांभाळताना कसरत होत आहे. त्यात एखादा ‘ट्रे’ चोरीला गेल्यास आर्थिक भरुदड माथी पडतो. नवोदितांना पारंपरिक पध्दतीने तिकीटे देता येत नाहीत. जुनी तिकीटे खपविण्याच्या फतव्याने राज्यातील ३० हजार वाहकांच्या दैनंदिन कामात अनेक अडचणी भेडसावत असल्याच्या तक्रारी आहेत.
महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्यांना इलेक्ट्रॉनिक यंत्रामार्फत तिकीटे दिली जातात. साधारणत: पाच वर्षांपूर्वी वेळेची बचत व वाहकाचे दैनंदिन काम सुलभ करण्याच्या उद्देशाने ही कार्यपध्दती स्वीकारण्यात आली. त्याआधी वाहक छापील स्वरुपातील तिकीटे वितरित करत होते. ही तिकीटे छापण्यासाठी महामंडळाचे मुंबईत मुद्रणालय आहे. नवी कार्यप्रणाली अंमलात आल्यावर तिकीट छपाईचे काम जवळपास बंद झाले. कारण, एसटी महामंडळाच्या सर्व वाहकांना एटीएम यंत्र उपलब्ध करून देण्यात आली. प्रत्येक फेरी झाल्यावर कराव्या लागणाऱ्या हिशेबाचे काम यंत्रामुळे सोपे झाले. फेरीनिहाय अथवा दिवसभरातील संपूर्ण हिशेब यंत्राद्वारे छापील स्वरुपात वाहकाच्या हाती पडतो. यामुळे संकलीत झालेली रक्कम व हिशेब यांचा ताळमेळ बांधणे सोपे झाले. मागील पाच वर्षांत यंत्राद्वारे तिकीट देण्याची पध्दत वाहकांच्या अंगवळणी पडली. नव्याने भरती झालेल्या वाहकांना जुन्या पारंपरीक पध्दतीत काडीमात्र रस नाही. या एकंदर स्थितीत छापखान्यात सुमारे ३६ कोटी रुपये किंमतीची तिकीटे पडून असल्याचे लक्षात आल्यानंतर महामंडळाने ती संपविण्याची सक्ती केली आहे.
मुंबई, नाशिकसह राज्यातील इतर विभागात वाहकांनी छापील तिकीटे आधी संपवावी अशी सूचना करण्यात आली आहे. यामुळे वाहकास सध्या एकाचवेळी इलेक्ट्रॉनिक व छापील अशी दोन्ही स्वरुपाची व्यवस्था घेऊन बसमध्ये फिरावे लागते. नवी पध्दती अंगवळणी पडल्याने जुन्या पध्दतीने तिकीटे वितरित करताना अडचणी येतात. नव्या वाहकांना छापील तिकीटे वितरित करता येत नसल्याने वेगळीच समस्या भेडसावत आहे.
वाहक अर्थात कर्मचाऱ्यांशी संबंधित निर्णय घेताना व्यवस्थापनाने कर्मचारी संघटनेला विश्वासात घेतले नसल्याची तक्रार एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी चव्हाण यांनी केली. नवी पध्दती राबविण्याआधी जुनी तिकीटे संपविणे आवश्यक होते. मुद्रणालयात पडलेल्या तिकीटांना वाळवी लागण्यास सुरूवात झाल्यावर महामंडळाला जाग आली आणि त्याचा फटका वाहकांना सोसावा लागत आहे. दोन व्यवस्था सांभाळतांना वाहकांची कसरत होते. छापील तिकीटांचा ‘ट्रे’ काही ठिकाणी चोरीला जाण्याच्या घटना घडल्या. त्यास वाहकास जबाबदार धरून त्याच्याकडून तिकीटांच्या मूल्याची संपूर्ण रक्कम पगारातून वसूल केली जाते. स्थानकावर बसखाली उतरणेही वाहकास महागात पडत असल्याची तक्रार चव्हाण यांनी केली. यामुळे छापील तिकीटे संपविण्याच्या सक्तीला संघटनेचा विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आधुनिक तिकीट वितरण प्रणालीतही दोष
एसटी बसमध्ये तिकीट वितरणासाठी एटीएम या आधुनिक प्रणालीच्या वापराचे काही फायदे असले तरी या व्यवस्थेत काही दोष असल्याचे निष्पन्न झाले आहे. यंत्राद्वारे दिले जाणारे हे तिकीट जुन्या छापील तिकीटांच्या तुलनेत आकाराने लहान आहे. यामुळे प्रवासात ते गहाळ होण्याचाही धोका आहे. या तिकीटावरील शाई लवकर पुसली जाते. ही यंत्र चार्जिग करावी लागतात. काही यंत्र योग्य पध्दतीने चार्ज होत नसल्याची तक्रार आहे. बस प्रवासात ही यंत्र बंद पडण्याचेही प्रकार घडतात. या व्यवस्थेसाठी एसटी महामंडळाने एका खासगी कंपनीशी पाच वर्षांचा करार केला होता. या कराराची मुदत आता संपुष्टात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वाहकास दोन्ही  पध्दती अनिवार्य
एसटी बसच्या वाहकांना एटीएम यंत्र आणि छापील तिकीटे या दोन्ही पध्दती वापरणे बंधनकारक आहे. छापील स्वरुपाची बरीच तिकीटे शिल्लक असल्याने ती आधी संपवावी म्हणून प्रयत्न केला जात आहे. ही तिकीटे खराब होण्याचा धोका आहे. दोन्ही व्यवस्था वापरणे बंधनकारक असताना त्यास विरोध करणारे अपूर्ण माहिती देत आहेत.
– यामिनी जोशी, विभाग नियंत्रक (एसटी महामंडळ, नाशिक)