महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने देश-विदेशातून आलेल्या पर्यटकांचे ठिकठिकाणी स्वागत करून शुक्रवारचा २६ सप्टेंबर हा ‘जागतिक पर्यटन दिन’ साजरा करण्यात आला.
पारंपरिक महाराष्ट्रीय पद्धतीचे फेटे बांधलेल्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) अधिकाऱ्यांनी सांताक्रुझ आणि सहार विमानतळ, छत्रपती शिवाजी टर्मिनस, दादर रेल्वे स्थानक आणि एमटीडीसीच्या शहरातील विविध काऊंटर्सवर पर्यटकांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. एमटीडीसीची माहितीपत्रकेही या वेळी वाटण्यात आली.
आम्ही पर्यटकांच्या आदरातिथ्याबाबत जागरूक आहोत, हे दाखवणारे हे एक छोटेसे, पण महत्त्वाचे पाऊल होते. आपल्या राज्यात येणाऱ्या पर्यटकांना आदर व प्रामाणिकपणाच्या भावनेने वागवावे आणि त्यांचा येथील मुक्काम विशेष ठरावा हा संदेश पर्यटन उद्योगातील टॅक्सीचालक ते भागधारक या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न होता, असे राज्याच्या पर्यटन विभागाच्या सचिव आणि एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक वल्सा नायर-सिंग म्हणाल्या.
या वर्षी संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतिक पर्यटन संघटनेने (यूएनडब्ल्यूटीओ) ‘पर्यटन आणि समुदाय विकास’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम साजरा केला. अधिकृत कार्यक्रम मेक्सिको येथे पार पडला. या संकल्पनेशी सुसंगत असे ‘महाराष्ट्रातील समुदायाधारित पर्यटन : भवितव्य, प्रगती आणि आश्वासने’ या विषयावरील चर्चासत्र एमटीडीसीतर्फे आयोजित करण्यात आले. यात महाराष्ट्रातील समुदायाधारित पर्यटनाबाबत अनुभवांचे आदानप्रदान आणि यशोगाथा यांचा समावेश होता. नगर जिल्ह्य़ातील हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार, जळगावच्या गांधीतीर्थच्या वंदना मुळे, साहाय्यक वनसंरक्षक अरविंद भोसले आणि एमटीडीसीचे उपमहासंचालक चंद्रशेखर जैस्वाल हे सहभागी झाले होते.