गिरणी कामगारांना मुंबईत हक्काचे घर मिळावे म्हणून ‘म्हाडा’तर्फे काढण्यात आलेल्या सोडतीमधील यशस्वी अर्जदारांना आर्थिक साह्य़ देण्याच्या योजनेत मुंबै बँकेने आतापर्यंत १७२२ कामगारांना १११ कोटी रुपयांचे गृह कर्ज मंजूर केले आहे.
गिरणी कामगारांना घर देण्याच्या प्रक्रियेत मुंबै बँकेची नोडल एजन्सी म्हणून निवड झाली होती. विजेत्या कामगारांची कागदपत्रे जमा करून घेणे, पात्र ठरलेल्या उमेदवारांना देकारपत्र देणे, घराची दहा टक्के रक्कम घेऊन ती म्हाडाकडे जमा करणे व गृह कर्जाची सोय देणे ही कामे बँक करत आहे.
आतापर्यंत बँकेने १७२२ गिरणी कामगारांना एकत्रितपणे १११ कोटी ८३ लाख रुपयांचे गृहकर्ज मंजूर केले आहे. त्यातील १५८२ कामगारांनी गृहकर्ज उचलून ताबाही घेतला आहे. तर चार कोटी रुपयांचे ५८ अर्ज प्रक्रियेत आहेत. आणखी ७० ते ८० कोटी रुपयांचे गृहकर्ज बाकीच्या गिरणी कामगारांसाठी वितरित होण्याचा अंदाज आहे.