नैसर्गिक आपत्ती, घातपात, चोरी, विषबाधा, चेंगराचेंगरी, तसेच विसर्जनाच्या वेळी होणारा कार्यकर्त्यांचा अपघात आदी बाबी लक्षात घेऊन शिवसेनेने दक्षिण मुंबईतील नोंदणीकृत तब्बल १५०० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना विम्याची कवचकुंडले मिळवून दिली आहेत. यामध्ये लहान मंडळांचाही समावेश आहे. या विम्यासाठी मंडळांवर कोणताच भार पडणार नसल्याने पदाधिकारीही खूष झाले आहेत. विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने मंडळांना खूष करण्यासाठी राजकीय पक्षांनी अशा नानाविध क्लृप्त्या वापरण्यास सुरुवात झाल्या असून विम्याची कल्पना हा त्याचाच एक भाग आहे.
गणेशोत्सव अवघ्या २२ दिवसांवर येऊन ठेपला असून मूर्तीकार गणेशमूर्तीवर अखेरचा कुंचला फिरविण्यात मग्न आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळेही गणेशोत्सवाची जय्यत तयारी करीत  आहेत. काही वेळा मंडपस्थळी लागणारी आग अथवा अन्य अपघात, विसर्जनाच्या वेळी जखमी होणारे कार्यकर्ते आदी छोटय़ा-मोठय़ा कारणांमुळे मंडळांना मोठा आर्थिक फटका बसतो. काही मंडळांच्या तिजोरीत गणेशोत्सव साजरा करण्यापुरती वर्गणी गोळा होते. त्यात अशी विघ्ने उभी राहिल्यानंतर मंडळाचे आर्थिक गणितच बिघडून जाते. त्यामुळे शिवसेनेच्या दक्षिण मुंबई विभाग क्रमांक ८ ने गणेशोत्सव मंडळांना मदतीचा हात पुढे केला आहे. शिवसेनेचे दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीच्या मदतीने या परिसरातील गणेशोत्सव मंडळांना सुरक्षेसाठी विम्याची कवचकुंडले मिळवून दिली आहेत.
विमाछत्र केवळ नोंदणीकृत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाच लाभणार असून त्यांच्या उत्सवाला कायदेशीर मान्यता असणे आवश्यक आहे. विम्याचे क्षेत्र मुख्य प्रवेशद्वारापासून गणेश मंडपापर्यंत मर्यादित असून विम्याअंतर्गत दावा करण्यासाठी पोलिसांचा अहवाल, उत्सवाच्या खर्चाचे बिलासह तपशील असणे आवश्यक आहे. नोंदणीकृत ज्वेलर्सकडून दागिन्यांची यादी करणे आवश्यक असून यादीमध्ये प्रत्येक दागिन्याचा आकार, वजन आणि किंमत अंतर्भूत करणे बंधनकारक आहे. मंडळाची एक लाखाहून अधिक रक्कम बँकेत घेऊन जाताना सोबत पोलीस अथवा सुरक्षा सहाय्यक असावा अशी अटही विम्याचे संरक्षण घेणाऱ्या मंडळांवर घालण्यात आले आहे. पांडुरंग सकपाळ यांनी पाच लाख रुपयांहून अधिक रक्कम विम्यापोटी भरली असून आतापर्यंत १५०० मंडळांना संरक्षण देण्यात आले आहे. आणखी काही मंडळांनाही विम्याच्या छत्राखाली घेण्याचा त्यांचा इरादा आहे.
या संकटांना विमाकवच..
आग, विस्फोट, भूकंप, वादळ, पूर, दहशतवादातून घडणारा घातपात, घुसखोरी, चोरी, लूट, मंडपापासून बँकेपर्यंत घेऊन जाण्यात येणारी जोखीम, गणेशमूर्तीवरील आभूषणांची जोखीम, प्रसादातून भाविकांना होणारी विषबाधा, मंडपस्थळी होणारी चेंगराचेंगरी, गदारोळामुळे होणारी शारिरीक हानी, गणेशमूर्तीच्या विसर्जनाच्या वेळी होणारा कार्यकर्त्यांचा अपघात आदी गोष्टींचा समावेश असलेला विमा दक्षिण मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी उतरविण्यात आला आहे.