गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यांत एक प्रदर्शन मुंबईत भरले होते. पुढच्या आठवडय़ात ते जर्मनीत भरत आहे. परंतु पुन्हा पाच महिन्यांनी ते मुंबईत भरणारच आहे. परंतु  मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मात्र हे प्रदर्शन जर्मनीतच जाऊन पाहायचे आहे. त्यासाठी लाखो रुपये खर्च करून जर्मनीला जाण्याचा बेत पालिका अधिकाऱ्यांनी आखला आहे. विशेष म्हणजे अधिकाऱ्यांच्या संभाव्य जर्मनी दौऱ्याचा नगरसेवकांना पत्ताही नाही!
मलनि:स्सारण, पाणी, कचरा, प्रदूषण विषयक ‘आयफॅट ऑफ जर्मनी’ प्रदर्शनाचे ५ ते ९ मे २०१४ दरम्यान जर्मनीमध्ये आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात विविध देशांतील आधुनिक तंत्रज्ञानावर प्रकाशझोत टाकण्यात येतो. अशाच प्रकारचे ‘आयफॅट ऑफ इंडिया’ प्रदर्शन ९ ते ११ ऑक्टोबर २०१४ या काळात मुंबईत भरविण्यात येणार आहे. मात्र जर्मनीत जाऊन हे प्रदर्शन पाहण्यासाठी पालिकेच्या मलनि:स्सारण, प्रचालन, नियोजन आणि बांधकाम विभागातील अधिकारी उतावीळ झाले आहेत. त्यात सहाय्यक अभियंता संजय माने, सहायक्क अभियंता (प्रभारी) आनंद कंकाळ, उपअभियंता श्रीरंग गुडी आदी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पालिकेच्या कंत्राटदाराची खास माणसे या अधिकाऱ्यांची सरबराई करण्यासाठी जर्मनीला रवाना होत असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. हे प्रदर्शन पाच दिवसांचे असले तरी ही सर्व मंडळी तब्बल १० दिवस जर्मनी सफरीवर जात आहेत. या जर्मनी दौऱ्यासाठी मुंबईकरांचे साडेचार लाख रुपये खर्च करण्यात येत आहेत.
करदात्यांचे लाखो रुपये खर्च करून दरवर्षी विविध समित्यांचे सदस्य असलेले नगरसेवक अन्य राज्यांमध्ये ‘अभ्यास दौऱ्यां’वर जात असतात. अन्य राज्यांतील छोटय़ा शहरांमधील महापालिका कोणत्या योजना राबविते, तेथे पाणीपुरवठा, स्वच्छता, मलनि:स्सारण आदी योजना कशा राबविल्या जातात, याची ‘पाहणी’ म्हणे हे नगरसेवक करतात. प्रत्यक्षात मात्र मुंबई आणि या शहरांची कोणत्याच निकषावर तुलनाच होत नाही. स्वाभाविकच अभ्यास दौऱ्यांचा मुंबईकरांना काहीच उपयोग नाही. त्यांच्या पैशावर नगरसेवक मात्र चैन करून परततात, असाच आजवरचा अनुभव आहे. या पाश्र्वभूमीवर नगरसेवक ‘सहल’ करून येतात, मग आम्ही काय घोडे मारले आहे’, अशी अधिकाऱ्यांची भावना न झाली तरच नवल! ‘आयफॅट ऑफ जर्मनी’ प्रदर्शन पाहण्यासाठी जाण्याची टूम याच गुर्मीतून आली आहे. ते निघाले आहेत. हेच प्रदर्शन गेल्या वर्षी मुंबईत भरले होते. त्यावेळी प्रदर्शन पाहून अधिकाऱ्यांचे मन भरले नाही म्हणून आता ते जर्मनीला निघाले आहेत. ऑक्टोबरमध्ये हेच प्रदर्शन मुंबईत होणार आहे. पण तरीही त्यांना जर्मनी भेटीची आस लागली आहे.