बुवाबाजी करणाऱ्या ढोंगी तांत्रिकांकडून लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेत त्यांना फसविण्याचे प्रकार नवीन नाहीत. परंतु मुंबईसह देशातच भोंदूबाबांकडून महिलांचे लैंगिक शोषण केले जात असल्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. जादूटोणाविरोधी कायद्याची परिपूर्ण माहिती नसल्याने अनेक ठिकाणी या कायद्याअंतर्गत गुन्हासुद्धा दाखल होत नसल्याचीही बाब समोर आली आहे. मुंबई पोलिसांना या आठवडय़ापासून अंधश्रद्धा निमूर्लन समितीतर्फे या कायद्याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे तर प्रत्येत पोलीस ठाण्यात जादूटोणाविरोधी कक्षही उभारला जाणार आहे.
जुलै महिन्यात मुंबईत एका तरुणीवर तिच्या मालकाकडून दोन र्वष सतत बलात्कार करण्यात येत होता. कस्तुरबा मार्ग पोलिसांनी या मालकाला अटक केली. माझ्याकडे दिव्य शक्ती आहे आणि मी तुझ्या अडचणी दूर करू शकतो असे सांगून त्याने तिच्याशी संबंध ठेवले आणि नंतर तो तिला ब्लॅकमेल करून पुन्हा बलात्कार करू लागला. यानंतर पीडित तरुणीने फिर्याद दिल्यानंतर या भोंदूबाबाला अटक करण्यात आली. (परंतु त्याच्यावर जादूटोणाविरोधी कायदा दाखल करण्यात आला नव्हता.)
आमिष दाखवून आणि अलौकिक शक्ती असल्याचा दावा करून अनेक भोंदूबाबा लोकांना फसवत असतात आणि महिलांचे लैंगिक शोषण करत असतात. त्याला अगदी सुशिक्षित लोकही बळी पडतात.  मे महिन्यात डोंबिवलीत एक विमा एजंटाने बुवाबाजीचे दुकान उघडले होते. पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून तो लोकांना फसवत होता. त्यासाठी कुमारीकेशी शरीरसंबंध प्रस्थापित करण्याची मागणी तो करत होता. या प्रकरणात स्वयंसेवी संस्थेच्या मार्फत सापळा लावून त्याला अटक करण्यात आली. त्याने २२ मुलींवर अशा पद्धतीने शरीरसंबंध ठेवल्याची कबुली दिली आहे.
गेल्या वर्षी मुंबईतल्या एका टीव्ही अभिनेत्रीला एका ढोंगी बाबाने आर्थिक फसवूणक करून बलात्कार केला होता. या २७ वर्षीय अभिनेत्रीला म्हाडाचे घर मिळवून देतो असे सांगून त्याने २५ लाख रुपये घेतले होते, शिवाय अडचणी दूर करण्याच्या नावाखाली तिच्यावर बलात्कारही करत होता.

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार मुंबईसह देशाच्या विविध भागांत महिला आणि अल्पवयीन मुलींवर भोंदू बाबा उपचार आणि समस्या दूर करण्याच्या नावाखाली लैंगिक शोषण करत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी या वाढत्या बुवाबाजीविरोधात चिंता व्यक्त केली आहे. अंधश्रद्धा रोखण्यासाठी प्रखर कायदा असून अज्ञानापोटी त्याची अंमलबजावणी होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. गुन्हा केला नसला तरी कुणी अलौकिक शक्ती असल्याचा दावा जरी केला तरी त्या व्यक्तीवर या कायद्याअन्वये गुन्हा दाखल होऊ शकतो, असा हा एकमेव कायदा असल्याचे  श्याम मानव यांनी सांगितले. डिसेंबर २०१३ मध्ये राज्यात हा कायदा लागू झाला. संपूर्ण देशातील हा एकमेव कायदा आहे. या कायद्याचे परिपूर्ण ज्ञान नसल्याने पीडितांना न्याय मिळत नाही तसेच गुन्हा दाखल करताना त्रुटी राहतात. त्यामुळे येत्या १० ऑगस्ट पासून मुंबईत पोलिसांना या कायद्याबाबत प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती श्याम मानव यांनी दिली. आम्ही राज्यभरातील पोलिसांना या कायद्याबाबत प्रशिक्षण देत आहोत. प्रशिक्षण कार्यक्रमात कायद्याची माहिती, त्यातील बारकावे समजावून देण्यात येतात.

* या कायद्यानुसार प्रत्येक जिल्ह्य़ाच्या ठिकाणी दक्षता अधिकारी आणि पोलीस ठाण्यात स्वतंत्र जादूटोणाविरोधी कक्ष असणे आवश्यक आहे. तसे परिपत्रक काढण्यात आले आहे. आम्ही लवकरच प्रत्येक पोलीस ठाण्यात असा कक्ष उभारणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांचे प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी दिली. पोलीस ठाण्याच्या बाहेर अंधश्रद्धा निमूर्लन समितीच्या पदाधिकाऱ्यांचे नावे आणि मोबाइल क्रमांक दिले जाणार आहेत.
* कायदा काय सांगतो?
अनेकदा लैंगिक शोषणाच्या प्रकरणात गुन्हा घडणे गरजेचे असते. तसेच पीडित सज्ञान असले तर त्याचा आरोपीला फायदा होतो. परंतु लैंगिक शोषणात जादूटोणाविरोधी कायदा कलम ३ (२) अंतर्गत गुन्हा दाखल होतो. अनुसूची कलम ११ (क) अन्वये एखादी अलौकिस शक्तीचा दावा करत असेल तरी तो गुन्हा ठरतो. अशा गुन्ह्य़ासाठी सहा महिने कारावास आणि पाच हजार रुपये दंड तसेच ७ र्वष कारावास आणि ५० हजार दंड अशा शिक्षेची तरदूत आहे.