३१ डिसेंबरच्या रात्रीच्या जल्लोषासाठी मुंबईकरांची तयारी सुरू झाली असून पोलिसांनीही या उत्साहाला गालबोट लागू नये यासाठी कंबर कसली आहे. मुंबईकरांना भयमुक्त वातावरणात नवीन वर्षांचा जल्लोष करता यावा यासाठी समुद्रकिनाऱ्यांवर ‘सीसीटीव्ही’बरोबरच नाइट व्हिजन कॅमेरे बसवणे, महिलांची छेडछाड रोखण्यासाठी खास महिला पोलिसांच्या पथकांची गस्त याबरोबरच मद्यपी चालकांना रोखून अपघात टाळण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.
प्रत्येक सण आणि उत्सवाच्या वेळी संभाव्य घातपाताच्या कारवाया लक्षात घेऊन मुंबई पोलीस सज्ज असतात. या वर्षी पेशावरच्या शाळेतील दहशतवादी हल्ला आणि ऑस्ट्रेलियाच्या कॅफेमधील ओलीस नाटय़ाच्या पाश्र्वभूमीवर मुंबई पोलीस अधिक सतर्क आहेत. नुकत्याच झालेल्या मुंबई पोलिसांच्या गुन्हे परिषदेत (क्राइम कॉन्फरन्स) पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी ३१ डिसेंबरच्या सुरक्षेबाबत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
मुंबई पोलिसांनी सुरक्षेसाठी तयार केलेल्या योजनेमध्ये यंदा पर्यटकांवर काही र्निबध घालण्यात आले आहेत. ‘गेट वे ऑफ इंडिया’च्या परिसरात लोक मोठय़ा संख्येने जमतात. त्यासाठी या भागात यंदा सामान नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. या ठिकाणी अतिरिक्त सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. मुंबईच्या सर्व चौपाटय़ांवर हॅलोजन लावण्यात येत आहेत. नाइट व्हिजन कॅमेरेही या ठिकाणी बसविण्यात येणार आहेत. याबरोबरच राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकडय़ा आणि शीघ्र कृतिदलही गर्दीच्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. पोलिसांच्या सर्व सुट्टय़ा रद्द करण्यात आलेल्या आहेत.
छेडछाड रोखण्यासाठी विशेष पथक
नववर्षांच्या स्वागतासाठी अनेक जण हॉटेल्स आणि पब्जमध्ये जात असतात तसेच चौपाटय़ा आणि इतर सार्वजनिक ठिकाणी जमतात. तेथे गर्दीचा गैरफायदा घेत महिलांची छेड काढण्याच्या आणि विनयभंगाच्या घटना घडतात. ते रोखण्यासाठी साध्या वेशातील महिला पोलीस कर्मचारी गर्दीत तैनात करण्यात येणार आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यातून महिला कर्मचाऱ्यांना या कामासाठी पाचारण करण्यात येणार आहे. या महिला कर्मचारी पब्ज, हॉटेल्स आणि इतर सार्वजनिक ठिकाणच्या कार्यक्रमात सहभागी होऊन ‘नजर’ ठेवतील. गैरवर्तन करणाऱ्यांना कायद्याचा हिसका दाखवतील.
शहरातील या बंदोबस्ताबरोबरच महामार्गावरून येणाऱ्या गाडय़ांची तसेच रेल्वे स्थानकात येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाडय़ांची तपासणी करण्यात येत आहे. हॉटेल आणि लॉजवर उतरलेल्या लोकांचीही पडताळणी करून संशयितांवर नजर ठेवण्यात येत आहे. २४ डिसेंबरपासूनच शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी करून तपासणी सुरू झाली आहे.
मद्यपींचा हैदोस रोखणार
मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे. नाताळच्या रात्री विलेपार्ले येथे मद्य पिऊन परतणाऱ्या तरुणांच्या वाहनाला अपघात होऊन एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे पोलीस अधिक दक्ष झाले आहेत. जागोजागी नाकाबंदी करून मद्यपी चालकांची तपासणी करण्यात येत आहे. लोकांना नाकाबंदीचे ठरावीक नाके माहिती असतात. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी फिरती नाकाबंदी सुरू केली आहे. तसेच गल्लीतही तपासणी केली जाणार आहे. ठाणे वाहतूक पोलिसांनी यंदा प्रथमच नवीन पद्धत अमलात आणली आहे. बार आणि पब्जच्या बाहेर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. एखादी व्यक्ती मद्यप्राशन करून निघाली आणि वाहन चालवण्यास सुरुवात करताच ताब्यात घेऊन कारवाई होणार आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री होणाऱ्या पाटर्य़ामध्ये अमली पदार्थाचा वापर मोठय़ा प्रमाणात होण्याची शक्यता गृहीत धरून गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी आपली कारवाई तीव्र केली आहे.