होळी आणि रंगपंचमीच्या सणासाठी मुंबईकर आतुर झाले असताना पोलिसांनीही अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून कंबर कसली आहे. बुधवारपासून तीन दिवस सर्व पोलिसांच्या रजा रद्द करण्यात आल्या असून रेल्वे प्रवाशांवर फुगे मारणाऱ्यांविरोधात विशेष गस्त सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी होळीचा सण असून शुक्रवारी रंगपंचमी साजरी होणार आहे. मात्र त्याच्या आधीच रस्त्यावरून जाणाऱ्यांवर फुगे मारण्याचे प्रकार सुरू होतात. होळीच्या या सणाचा बेरंग होऊ नये म्हणून मुंबई पोलीस आणि रेल्वे पोलिसांनी विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत. मुंबई पोलिसांनी बुधवारपासून सर्व पोलिसांच्या रजा तीन दिवस रद्द केल्या आहेत. संवेदनशील भागात या काळात विशेष बंदोबस्त ठेवला जाणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांचे प्रवक्ते आणि पोलीस उपायुक्त डॉ. धनंजय कुलकर्णी यांनी दिली. सणाचं पावित्र्य अबाधित राहावं, दोन समुदायांमध्ये शांतीचं आणि सलोख्याचं वातावरण राहावं यासाठी रेल्वे पोलीस आणि शहर पोलिसांनी मोहल्ला कमिटींच्या बैठका तसेच जनजागृती मोहीम सुरू केल्याची माहिती कुलकर्णी यांनी दिली. रंगपंचमीच्या काळात विनयभंग, छेडछडीचे प्रकार घडतात. ते रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलीस जागोजागी तैनात असतील. चौपाटय़ांवरही बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. दोन वर्षांपूर्वी धारावी येथे विषारी रंगामुळे शंभरहून अधिक मुलांना विषबाधा झाली होती. असे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. अन्न आणि औषध प्रशासनानेही बाजारातील विषारी रंगावर कारवाई सुरू केली आहे.

लोकलवर फुगे मारणाऱ्यांवर कारवाई
फुग्यांचा सर्वात जास्त फटका लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसतो. रुळालगतच्या झोपडपट्टय़ांमधून फुगे मारले जातात. त्यामुळे या भागात गस्ती सुरू करण्यात आलेल्या आहेत. असे प्रकार रोखण्यासाठी अशा वसाहतींमध्ये जनजागृती करण्यात येत असल्याचे रेल्वेच्या उपायुक्त (मध्य) रुपाली अंबुरे यांनी सांगितले. फुगे मारल्याने प्रवाशांना शारीरिक इजा होते. हा विकृत आनंद असून, त्यापासून लोकांना परावृत्त करण्यासाठी आम्ही विविध वस्त्यांमध्ये बैठका घेऊन जनजागृती करत असल्याचे अंबुरे यांनी सांगितले. या आठवडय़ात विभागातील सर्व पोलिसांना बंदोबस्ताचे काम लावण्यात येत असल्याचेही त्या म्हणाल्या. जर कुणी लोकल ट्रेनवरील प्रवाशांवर फुगे मारताना आढळले, तर रेल्वेच्या ९८ ३३३३ ११११ या हेल्पलाइनवर तक्रार करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

‘फुगाफेक’ झाल्यास सोसायटय़ांच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा
नीलेश पानमंद, ठाणे<br />इमारतीच्या गच्चीवरून पादचाऱ्यांवर पाण्याने भरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या वा फुगे भिरकवणाऱ्या टोळक्यांना आवर घालण्यासाठी ठाणे पोलिसांनी यंदा अशा इमारतींमधील सोसायटय़ांच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे. एखाद्या इमारतीमधून फुगे भिरकवल्याची तक्रार आली, तर संबंधित असोसिएशनच्या अध्यक्ष किंवा सरचिटणीस असलेल्या पदाधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यात येऊन जबाब नोंदवावा लागणार आहे. त्यामुळे होळी अथवा धुळवडीच्या दिवशी गच्चीच्या दरवाजाला टाळे ठोका अथवा तेथून फुग्यांचा मारा होणार नाही, याची काळजी बाळगा, असे आवाहन ठाणे पोलिसांनी केले आहे.
धुलीवंदनाला अजून काही दिवस शिल्लक असले, तरी नेहमीप्रमाणे यंदाही धुळवडीचा ‘कार्यक्रम’ सुरू झाला आहे. रस्त्यावरून चालणाऱ्यांच्या अंगावर फुगे अथवा रंग फेकणे, हा यातील सर्रास होणारा प्रकार आहे. पाण्याने भरलेले फुगे लागून अथवा त्यातील घाणमिश्रित पाणी डोळय़ांत जाऊन पादचारी जखमी होण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. विशेषत: महिला वर्गाला अशा ‘फुगेफेकूं’चा अधिक त्रास होतो. या पाश्र्वभूमीवर ‘फुगेफेकूं’चे मुख्य आश्रयस्थान असलेल्या इमारतींच्या गच्च्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार सर्व इमारतींच्या सोसायटी पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात येत असून, ज्या इमारतीच्या गच्चीवरून पाणी किंवा रंगाने भरलेले फुगे फेकल्याची तक्रार येईल, त्या इमारतीच्या सोसायटीच्या अध्यक्ष आणि सरचिटणीस यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. धुळवडीच्या उत्सवाला गालबोट लागू नये म्हणून शहरात गस्त वाढवण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत, असे ठाण्याचे प्रभारी पोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी सांगितले.