इलेक्ट्रॉनिक कचऱ्याची विल्हेवाट हा पालिकेसमोर भीषण प्रश्न म्हणून उभा ठाकत असतानाच मुंबईतील दोन विद्यार्थिनींनी आपल्या कल्पकतेने भंगारात निघालेल्या ओव्हनला नवसंजीवनी देत त्यातून फळे-भाज्या टिकविण्याचे तंत्र शोधून काढले आहे.
या विद्यार्थिनींनी शोधलेल्या या तंत्राचे मुंबईत आणि देशात इतरत्र विविध स्पर्धामध्ये कौतुक झाल्यानंतर आता हा ओव्हन अमेरिकेतील ‘आय स्वीप’ या विज्ञान प्रदर्शनात सहभागी होणार आहे. भंगारात म्हणून काढलेले ओव्हन टाकाऊ नसून त्यात फळे आणि भाज्या वाळवून त्याच्या जीवनसत्त्वांसह सुकविता येतात, असे या तंत्राचे सार आहे. या ओव्हनमध्ये भाज्या वाळविताना त्यातून वाफ निर्माण होते. वाफेचे रूपांतर पाण्यात होताना फळे-भाज्यांमधली जीवनसत्त्वे जशीच्या तशी पाण्यात उतरतात. या तंत्रावर हा ‘ओव्हन मॉडिफाइड डीहायड्रेटर’ बेतलेला आहे.
साक्षी पांडे आणि काजोल शेळके या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या ओव्हनचे विविध विज्ञान व राष्ट्रीय स्तरावरील तंत्र महोत्सवांमध्ये सादरीकरण करण्यात आले. ‘नॉर्थ मुंबई वेल्फेअर सोसायटी’च्या शाळेत नववीत शिकणाऱ्या या विद्यार्थिनींनी त्यांच्या शिक्षिका स्मिता निंबाळकर आणि राजी नायर यांच्या मार्गदर्शनाखाली हे तंत्र विकसित केले आहे.
एरवी फळे आणि भाज्या यांची साठवण रेफ्रिजरेटरमध्ये केली जाते. पण, त्यांची साठवणूक करताना त्यांचे डीहायड्रेशन करून ती वाळवून साठविल्यास बरेच दिवस टिकतील, असा विचार या तंत्रामागे होता. असे डिहायड्रेटर्स बाजारात असले तरी या विद्यार्थिनींना अपेक्षित असलेले तंत्र यात नव्हते. परदेशात असले तंत्र वापरले जाते. मात्र, ते तुलनेत अधिक खर्चीक आहे. मग सर्वसामान्यांना परवडेल असे तंत्र कसे विकसित करायचे? त्यांनी आपल्या शिक्षिकांची, पुस्तकांची, इंटरनेटची मदत घेतली. अखेर ओव्हनच्या साहाय्याने हे करता येईल, अशी कल्पना त्यांना सुचली.
साक्षी आणि काजोलने एका भंगारात निघालेल्या ओव्हनच्या मदतीने प्रयोगांना सुरुवात केली. त्यात सुरुवातीला त्यांनी भाज्या आणि फळे वाळविली. मात्र, त्यातली जीवनसत्त्वे वाफ आणि पाण्यातून वाया जात होती. मग ही जीवनसत्त्वे पाण्याच्या आधारे जमा कशी करायची?
डोक्यातला किडा इतका वळवळू लागला की त्याने या वाफेत काय असतं, ते शोधायला सुरुवात केली. त्यांनी ही वाफ एका नळीद्वारे भांडय़ात जमा केली. त्यांचे झालेले पाणी त्यांनी प्रयोगशाळेत नेऊन तपासले असता त्यात शरीराला आवश्यक असलेली जीवनसत्त्वे आढळून आली. आता ओव्हनमध्ये वाळवलेल्या भाज्या आणि फळे यांना पाहिजे तेव्हा टवटवीत कसे करता येईल, यावर आता या विद्यार्थिनी विचार करीत आहेत.